भारतातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या वेतनात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या क्रिकेटपटूंच्या वेतनाची तरतूद १८० करोड आहे. या तरतूदीत जर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने मान्यता दिली तर २०० करोड पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
याबद्दल या समितीच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले आहे की, “वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या वेतनात १००% वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच देशांतर्गत खेळणाऱ्या खेळाडूंच्याही वेतनात काही प्रमाणात वाढ होईल.”
याबरोबरच बीसीसीआयच्या एका उच्च अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “हे खेळाडू हे बीसीसीआयला मिळत असलेल्या महसुलाचे मोठे कारण आहे, मग बीसीसीआयला या खेळाडूंच्या वेतनासाठी २०० करोड परवडू शकत नाही का?”
यावर्षी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ४६ सामने खेळले आहेत त्यातून त्याने ५.५१ करोड कमावले आहेत. पण जर वेतन वाढ झाली तर त्याला १० करोडपेक्षाही जास्त रक्कम मिळेल. तसेच रणजी खेळणाऱ्या खेळाडूंना वर्षाला १२ ते १५ लाख रक्कम मिळते. त्यांना या बदलानुसार ३० लाख मिळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी कोहली, एम एस धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वेतन वाढीवर बीसीसीआयशी चर्चा केली आहे. त्याबरोबरच माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेतनात वाढ करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.