आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही दिवसापूर्वी दशकातील आपले सर्वोत्तम संघ जाहीर केले होते. यामध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 संघाचा समावेश होता. त्यामधे प्रामुख्याने भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने आपला दशकातील सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. यामध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे.
हॉगने आपला दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे. यामध्ये विराट कोहली या एका भारतीय खेळाडूला स्थान दिले आहे.
ब्रॅड हॉगने आपल्या कसोटी संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देशातील प्रत्येकी 3-3 खेळाडूंची निवड केली आहे. इंग्लंड या देशाच्या 2 खेळाडूंची निवड केली आहे. त्याचबरोबर भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या देशांतील प्रत्येकी 1 खेळाडूचा समावेश आहे.
तसेच या संघात त्याने 3 वेगवान गोलंदाज आणि 1 फिरकीपटू व अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे. या संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिका संघाचा महान खेळाडू जॅक कॅलिसची निवड केली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून एबी डिविलियर्सची निवड केली आहे.
ब्रॅड हॉग विराट कोहलीबद्दल बोलताना म्हणाला, “क्रमांक 4 वर फलंदाजी करण्यासाठी मला अशा खेळाडूची गरज होती. जो थोडा आक्रमक पद्धतीने फलंदाजी करू शकेल आणि एकट्याच्या जीवावर सामना जिंकवू शकेल. यासाठी मी भारताच्या विराट कोहलीची निवड केली आहे. क्रमांक 5 साठी मी स्टीव्ह स्मिथची निवड केली आहे. जर विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात भागीदारी झाली तर धावफलक पुढे जात राहिली आणि चाहत्यांचे खूप मनोरंजन होईल.”
याशिवाय ब्रॅड हॉगने आपल्या संघात केन विलियम्सन आणि ऍलिस्टर कूक या सारख्या दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. याव्यतिरिक्त पॅट कमिन्स, डेल स्टेन, डेविड वॉर्नर आणि जेम्स अँडरसन या खेळाडूंचाही संघात समावेश आहे.
ब्रॅड हॉगचा दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ :
ऍलिस्टर कूक, डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जॅक कॅलिस, एबी डिविलियर्स(यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, डेल स्टेन, जेम्स अँडरसन, यासिर शाह.
महत्त्वाच्या बातम्या –
‘डेल स्टेन’ने आयपीएलबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय! नववर्षाच्या सुरुवातीलाच आरसीबीच्या चाहत्यांना धक्का
“सिराजप्रमाणे नटराजनही कसोटी पदार्पण सामन्यात चमकेल”, ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून कौतुकाची थाप
धोनीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सुरेश रैना म्हणाला, “आमची भागीदारी पुन्हा सुरू होईल”