आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे खराब फॉर्ममध्ये आहेत. तरी त्यांना संघात समाविष्ट केल्याबद्दल वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज ब्रायन लारा याने मुंबई इंडियन्सच्या निवड समितीवर टीका केली आहे.
आयपीएलमध्ये सतत फ्लॉप होत असलेल्या या दोन फलंदाजांच्या निवडीवर लाराने प्रश्न उपस्थित केले आहेत. वेस्टइंडिजच्या माजी कर्णधाराचा असा विश्वास आहे की, हे दोन्ही खेळाडू एकतर टी -२० विश्वचषकातील त्यांच्या स्थानामुळे दबावाखाली आले आहेत किंवा त्यांनी विजयाची भूक गमावली आहे. खराब फॉर्ममुळे मुंबई इंडियन्सने इशानला शेवटच्या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते आणि आता सूर्यकुमारचे स्थानही धोक्यात आले आहे.
लारा म्हणाला, ‘कदाचित भारतीय संघात निवड झाल्याने दोघांवर दबाव वाढला असेल आणि त्यामुळे त्यांच्या धावांचा ओघ कमी झाला असेल. जर तुम्ही सौरभ तिवारीकडे बघितले तर तो सूर्यकुमार आणि इशानपेक्षा धावा काढण्याची जास्त भूक दाखवत आहे. मला वाटते सूर्यकुमार आणि इशान यांनी आता थोडे अधिक गंभीर झाले पाहिजे आणि त्यांच्या संघाला स्पर्धा जिंकण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तूर्तास, त्यांनी विश्वचषक कसे विसरता येईल आणि मुंबईला स्पर्धेत परत कसे आणता येईल यावर लक्ष दिले पाहिजे. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे कदाचित आता अनेक निवडकर्त्यांनी त्यांची प्रतिष्ठा गमावली असेल.’
सुर्यकुमारने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गेल्या चार सामन्यांमध्ये ०, ८, ५ आणि ३ धावा केल्या आहेत. इशान सुद्धा फार काही करू शकलेला नाही. त्याने शेवटच्या तीन सामन्यांमध्ये ११, १४ आणि ९ धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघात मंगळवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात मुंबईने सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम गोलंदाजी करत मुंबईने पंजाबला १३५ धावांवर रोखलं. मुंबईकडून सौरभ तिवारीने एकहाती झुंज देत ३७ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पंड्याने ४० धावा ठोकत आणि पोलार्डच्या नाबाद १५ धावांच्या मदतीने सामना मुंबईला जिंकवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
स्कूप शॉटच्या नादात स्मिथने स्वत:लाच लागून घेतला चेंडू, मग केली अशी कृती की, मीम्स होतायेत व्हायरल
अश्विनला दोषी ठरवणाऱ्या वॉर्नला भारतीय चाहत्यांनी दाखवला आरसा; करून दिली ‘त्या’ प्रकरणाची आठवण
ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळीबरोबरच ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, ठरला ५ वाच ऑसी क्रिकेटर