नवी दिल्ली । भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना आधी श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलिया अश्या दोनही मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघ निवडीवर मोठी टीका होत आहे. यामुळे रवी शात्री यांना स्वतः पुढे येऊन यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
भारतीय संघाची या मालिकेसाठी निवड रविवारी झाली. तेव्हा प्रसिद्धी पत्रकात मुख्य निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले होते, ” पहिल्या तीन सामन्यांसाठी संघ निवड ही रोटेशन पद्धतीने झाली आहे. त्यामुळे या मालिकेत अश्विन आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. “
“संघाने श्रीलंकेत अतिशय चांगली कामगिरी केली आहे. विशेषकरून अक्सर पटेल आणि युझवेन्द्र चहल यांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली. त्यामुळे आम्ही एक चांगला राखीव संघ बनवत आहोत. “ असेही प्रसाद पुढे म्हणाले.
त्यानंतर अनेक मोठ्या माजी क्रिकेटपटुंनी या निवडीवर प्रश्न उपस्थित केल्यावर आज भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले. इंडिया टुडेशी बोलताना शास्त्री म्हणाले, ” आपण अश्विन आणि जडेजाला सतत क्रिकेट नाही खेळवू शकत. अश्विनला संघात परतण्यासाठी अजून खूप वेळ मिळणार आहे कारण विश्वचषक २०१९ ला अजून २ वर्षे बाकी आहेत. त्यामुळे सध्या कसोटी क्रिकेटवर भर असेल. “