fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

“आतापर्यंत दिशाभूल झालेल्या पलटणच्या मदतीला कॅप्टन कूल: पुणेरी पलटण संघ विश्लेषण!”

– शारंग ढोमसे

पुणेरी पलटणच्या संघाला प्रो कबड्डीत आतापर्यंत फारसे घवघवीत यश मिळलेलले नाही. संघाला एकदाही प्रो कबड्डीचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. ६ हंगामात केवळ एकदा पुण्याने उपांत्य फेरी गाठली आहे. अजय ठाकूर, मंजित चिल्लर, दीपक हुडा, गिरीश इरनाक यांसारखी मातब्बर मंडळी पुण्याकडून खेळली आहे तरीदेखील पुण्याला विजेतेपदाची चव चाखता आलेली नाही.

यंदा मात्र अनुप कुमारला मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्त करून प्रो कबड्डीच्या ७ व्या हंगामासाठी पुणेरी पलटण ने पहिले पाऊल अगदी योग्य टाकले आहे. गेल्या हंगामातच अनुप कुमार ने आपली निवृत्ती जाहीर केली होती. आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेण्याचे कसब अनुपकडे नक्कीच आहे त्यामुळे अनुपच्या मार्गदर्शनाखाली पुणे विजेतेपदाचे तोरण यंदातरी बांधते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

६ व्या हंगामातील एकही प्रमुख खेळाडू संघात कायम न ठेवता पुण्याने ७ व्या हंगामासाठी नव्याने संघबांधणी केली आहे. ७ व्या हंगामासाठी असलेल्या पुण्याच्या संघाचे हे विश्लेषण.

पुणेरी पलटण सीजन ७ साठी संघ

विश्लेषण:- चढाईची धुरा तरुण पिढीकडे: गेल्या मोसमात पुण्याचा मुख्य चढाईपटू नितीन तोमर जायबंदी असल्यामुळे त्याचा प्रचंड फटका ६ व्या मोसमात संघाला बसला होता मात्र असे असूनही पुण्याने पुन्हा एकदा नितीन तोमर वर विश्वास दाखवला आहे. तब्बल १ कोटी २० लाख मोजून पुण्याने त्याला आपल्या संघात कायम केले आहे. अर्थातच नितीन आक्रमणात पुण्याचा प्रमुख सेनापती असेल.

चढाईचे इतर शिलेदार निवडताना मात्र पुण्याने प्रस्थापित खेळाडूंऐवजी तरुण रक्तालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते. गेल्या मोसमात दमदार कामगिरी करणाऱ्या दर्शन कादियान आणि मंजित यांचा आपल्या ताफ्यात समावेश करून पुण्याने आपल्या आक्रमणाला अधिक बळकटी दिली आहे. दर्शन आणि मंजित या दोघांनाही ६ व्या मोसमात अनुक्रमे ‘यू मुंबा’ आणि ‘पाटणा पायरेट्स’ कडून खेळतांना सुरेख कामगिरी करत सहायक चढाईपटूची भूमिका चोख बजावली होती.

संघात परदीप नरवाल सारखा मातब्बर चढाईपटू असतानाही मंजित ने २२ सामन्यांत चढाईत ३.९५ च्या सरासरीने ८७ गुण मिळवत आपली छाप सोडली होती. त्यामुळे आता पुण्याकडून खेळतांना तो कसा प्रदर्शन या कडे सगळ्यांच्या नजरा असतील. एकंदरीतच पुण्याची चढाईची कामगिरी जुन्या सेनापतीच्या नेतृत्वात नवीन शिलेदार पार पाडतील!

गिरीश-सुर्जित जोडीमुळे बचावाला बळकटी: लिलावपूर्वी सुरेंदर नाडाला संघात घेण्याची इच्छा अनुपने बोलून दाखवली होती प्रत्यक्षात मात्र गेल्या मोसमातील कर्णधार गिरीश इरनाकच पुन्हा एकदा पुण्याचा डावा कोपरा सांभाळेल. अनुभवी सुरजीत चा समावेश करत मधल्या फळीला बळकटी देण्यात पुणे यशस्वी ठरले आहे.

सुरजीत उजव्या मध्यरक्षकाची भूमिका बजावेल त्यामुळे विरुद्ध संघाच्या उजव्या चढाईपटूंना गिरीश-सुरजीत अशा घातक जोडगोळीला तोंड द्यावे लागणार आहे. या दोघांनाही ६ व्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सर्वाधिक बचावाचे गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गिरीश आणि सुरजीत अनुक्रमे १२ व्या आणि १४ व्या स्थानावर होते. त्यामुळे गेल्या मोसमातील अपयश पुसुन टाकत पुन्हा दमदार कामगिरी करण्यास दोघे उत्सुक असतील. शुभम शिंदे किंवा इराणचा हादी ताजिक उजवा कोपरा सांभाळेल.

सागर कृष्णा हा डाव्या कोपऱ्यात खेळणारा चांगला खेळाडू पुण्याकडे आहे. त्यामुळे गिरीशला डाव्या मध्य रक्षकाची भूमीका देऊन सागरला डाव्या कोपऱ्यात खेळवण्याचा पर्यायही पुण्याकडे उपलब्ध असेल. एकंदरीत गिरीश आणि सुरजीत यांच्यावर बचावाची भिस्त असली तरी शुभम शिंदे सारख्या प्रतिभाशाली आणि नवख्या खेळाडूंमूळे पुण्याचा बचाव संतुलित वाटतो.

जमेच्या बाजू:
१.अनुप कुमारच्या रुपात मातब्बर आणि संयमी प्रशिक्षक
२.नितीन तोमर सारखा भरवशाचा चढाईपटू
३.नव्या दमाचे आक्रमण
४.गिरीश-सुरजीत ची घातक जोडगोळी

कमकुवत बाजू:
१.अष्टपैलू खेळाडूंची कमतरता
२.गिरीशचा हरपलेला सूर
३.उजव्या बाजूचा बचाव तुलनेने कमकुवत
४.राखीव खेळाडूंची फळी फारशी मजबूत नाही.

You might also like