चेन्नई । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीने सहाव्या मोसमात बाद फेरीची संधी आणखी वाढविली. गुरुवारी घरच्या मैदानावरील लढतीत चेन्नईयीनने जमशेदपूर एफसीवर 4-1 असा शानदार विजय मिळविला. याबरोबरच चेन्नईयीनने एक क्रमांक प्रगती करीत आगेकूच कायम राखली.
नेहरू स्टेडियमवर लिथूएनियाचा 32 वर्षीय स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीसने दोन गोलांसह मोलाचा वाटा उचलला. माल्टाचा 33 वर्षीय आंद्रे शेम्ब्री आणि भारताचा लालियनझुला छांगटे यांनी प्रत्येकी एक गोल केला. जमशेदपूरचा एकमेव गोल सर्जिओ कॅस्टेलने नोंदविला.
चार गोल केल्यामुळे चेन्नईयीनचा गोलफरक 0 झाला. त्यांनी 20 गोल केले असून तेवढेच गोल त्यांच्याविरुद्ध झाले आहेत. बाद फेरीची शर्यत अंतिम टप्यात येईल तेव्हा उणे गोलफरक नसणे महत्त्वाचे ठरेल. त्यादृष्टिने चेन्नईयीनसाठी हा विजय उपयुक्त ठरेल.
चेन्नईयीनने 13 सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण झाले. त्यांनी सातवरून एक क्रमांक प्रगती करीत सहावे स्थान गाठले. त्यांनी जमशेदपूरला मागे टाकले. जमशेदपूरला 13 सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. चार विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण आहेत.
गतविजेता बेंगळुरू एफसी (14 सामन्यांतून 25) आघाडीवर आहे. एटीके एफसी आणि एफसी गोवा यांचे प्रत्येकी 24 गुण आहेत. सरस गोलफरकामुळे एटीके दुसऱ्या, तर गोवा तिसऱ्या स्थानावर आहे. ओदीशा एफसी (14 सामन्यांतून 21) चौथ्या, तर मुंबई सिटी एफसी (13 सामन्यांतून 19) पाचव्या क्रमांकावर आहे.
पहिल्या सत्रात 13व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या रॅफेल क्रिव्हेलारोने मध्य रेषेनजिक चेंडूवर ताबा मिळविला. जमशेदपूरच्या दोन-तीन स्पर्धकांना हुलकावणी देत त्याने आगेकूच करीत आंद्रे शेम्ब्रीला पास दिला. मग शेम्ब्री घोडदौड करीत असतानाच वॅल्सकीसनेही मुसंडी मारत पुन्हा पास मिळविला. त्यावेळी जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल पुढे सरसावला होता, पण वॅल्सकीसने चेंडू त्याच्या डोक्यावरून नेटच्या डाव्या कोपऱ्यात मारला.
पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनने दुसरा गोल केला. क्रिव्हेलारोने घेतलेल्या कॉर्नरवर शेम्ब्रीने अचूक फिनिशींग केले. मध्यंतरास चेन्नईयीनकडे 2-0 अशी उपयुक्त आघाडी होती.
दुसऱ्या सत्रात 71व्या मिनिटाला हुकमी खेळाडू सर्जिओ कॅस्टेल याने जमशेदपूरचा पहिला गोल केला. त्यानंतर जमशेदपूर चिवट खेळाच्या जोरावर किमान बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल अशी आशा होती, पण वॅल्सकीसने चार मिनिटांत वैयक्तिक दुसरा, तर संघाचा तिसरा गोल केला. तीन मिनिटे बाकी असताना छांगटेने यजमान संघाचा चौथा गोल केला.