पुणे । पुष्पांजली सुपर स्ट्रायकर्स संघाने गॅलेक्सी सर्कल प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत पी.पी. रॉयल्स संघावर १४ धावांनी मात करून विजेतेपद पटकावले. पुष्पांजली संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १२४ धावा केल्या. यानंतर पी. पी. रॉयल्स संघाला ३ बाद ११० धावाच करता आल्या.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. श्रीकांत कल्याणी, मधूसुदन लड्ढा,चंदू साकरिया, मयुर शहा, कमलेश खत्तोड, महेश राठी, दीपक मुंदडा, कमल सोमानी, कल्पेश भुतडा उपस्थित होते.
प्रथम फलंदाजी करताना पुष्पांजली संघाचा सलामीवीर निर्मल भट्टड १ षटकारसह १५ धावांवर माघारी परतला. यानंतर धावांचे अर्धशतक फलकावर लागत नाही तोच, सुनील बाहेती (१२) देखील बाद झाला.
यानंतर कर्णधार कल्पेश भुतडा आणि सुदर्शन बिहानी या जोडीने डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने चौफेर फटकेबाजी करताना पी. पी. रॉयल्सच्या गोलंदाजांची कसोटी बघितली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ७७ धावांची नाबाद भागीदारी रचली. त्यामुळे पुष्पांजली संघाला निर्धारित १२ षटकांत १२४ धावांपर्यंत मजल मारता आली.
यात कल्पेशने ३९ चेंडूत ९ चौकार व १ षटकारसह नाबाद ७२, तर सुदर्शनने १२ चेंडूत ५ चौकारासह नाबाद २३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पी.पी. रॉयल्स संघाच्या सुनील कारवा आणि निलेश सारडा यांनी लढा दिला खरा; पण तो विजयासाठी पुरेसा ठरला नाही.
मालिकावीर कल्पेश भुतडा, सर्वोत्तम फलंदाज निलेश झंवर, सर्वोत्तम गोलंदाज विजय राठोड, सर्वोत्तम झेल अजय भंडारी, सर्वाधिक चौकार चंदन मुंदडा, सवार्धिक षट्कार निलेश झंवर यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
संक्षिप्त धावफलक ।
पुष्पांजली सुपर स्टायकर्स – १२ षटकांत २ बाद १२४ (कल्पेश भुतडा नाबाद ७२, सुदर्शन बिहानी नाबाद २३, अभय व्होरा १-२१, सुनील कारवा १-२९) वि. वि. पी. पी. रॉयल्स – १२ षटकांत ३ बाद ११० (सुनील कारावा ४४, निलेश सारडा नाबाद ३०, भूषण लोहिया १७, कल्पेश भुतडा १- २७, नीरज मुनोत १-२७).