ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डिकॉक यांचा वाद चांगलाच गाजत आहे. या वादाचे पडसाद चाहत्यांमध्येही बघायला मिळाले आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात काही चाहत्यांनी डेव्हिड वॉर्नरला डिवचण्यासाठी सोनी बिल विल्यम्सचे मास्क घातले होते.
तसेच या चाहत्यांबरोबर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या क्लाइव्ह एक्स्टीन आणि अल्ताफ काझी या दोन अधिकाऱ्यांनी फोटोही काढला. तसेच त्यांनी हा फोटो सोशल मीडियावरही शेयर केला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलिया संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची माफी मागावी लागली आहे.
सोनी बिल विल्यम्स याच्याबरोबर वॉर्नरची पत्नी कँडिस हिचे ११ वर्षांपूर्वी नाते होते. त्यामुळे वॉर्नरला चिडवण्यासाठी हा मास्क चाहत्यांनी घातला होता.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ख्रिस नेन्झानी यांनी माफी मागताना म्हटले आहे की, “दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातर्फे मी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची, अधिकाऱ्यांची, संघ व्यवस्थापनाची, खेळाडूंची आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागतो.”
काय आहे वॉर्नर डिकॉक प्रकरण:
डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांतील खेळाडू ड्रेसिंग रूमकडे जात असताना ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक यांमध्ये काही वाद सुरू होते.
माध्यमातील काही वृत्तानुसार दक्षिण अाफ्रिकेच्या क्वींटन डीकाॅकने आॅस्टेलियाच्या डेवीड वाॅर्नरच्या पत्नीवर केलेल्या कमेंटमुळे हे वाद वाढले होते.