भारतात माजी भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीची प्रचंड क्रेझ आहे. तो आता 43 वर्षांचा आहे. तरीही धोनीला मैदानावर पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. धोनीने आपल्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले. आगामी आयपीएल 2024 हंगामातही धोनी चेन्नईकडून खेळताना दिसेल अशी आशा थालाप्रेमींना आहे. दरम्यान आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा गोलंदाज सिमरजीत सिंग याने धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या सिमरजीत सिंगने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. आयपीएल 2024 मध्ये त्याने संघासाठी एकूण 5 विकेट घेतल्या. सिमरजीत यापूर्वी नेट बॉलर म्हणून दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. पण त्यानंतर चेन्नई संघाने 2022 च्या मेगा लिलावात त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले. सध्या तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करत असून त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याने धोनीबद्दल मोठे भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीला बोलताना सिमरजीत सिंग म्हणाला की, लहान मुलांची स्वप्न असतात की, त्यांनी ज्या खेळाडूला आयुष्यभर टीव्हीवर खेळताना पाहिले आहे त्याला एकदातरी प्रत्यक्षात भेटावे. तुम्ही एखाद्याला अनेक ट्रॉफी जिंकताना पाहिले आहे आणि तिच व्यक्ती जर तुमच्या समोर उभी असेल तर तुम्हाला हे स्वप्न आहे की सत्य? समजत नाही. जेव्हाही मी त्याला (धोनी) भेटतो तेव्हा मला नेहमी असे वाटते की जणू काही गोड स्वप्न आहे, मी अजूनही त्यातच आहे. असे दिसते की स्वप्न कधीच संपत नाही आणि धोनी नेहमीच समोर राहतो. पण दरवर्षी आयपीएल संपते. त्यामुळे घरी परत यावे लागते.
सिमरजीत पुढे म्हणाला की, मी प्रत्येक वेळी बोलतो. भैया (धोनी) निवृत्त होऊ नकोस. आम्हाला शिकवत राहा. कारण जगातील सर्वोत्तम गोष्टी तुझ्याकडूनच शिकता येतात. त्याने आयुष्यभर खेळत राहावे अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत धोनीने खेळत राहावे. तो आम्हाला खूप मार्गदर्शन करतो. तो तुम्हाला मानसिक आणि कौशल्यानुसार मार्गदर्शन करतो. आपण सर्वांनी काय करावे लागेल? आमचे सर्वोत्तम पर्याय कोणते आहेत? या खेळपट्टीवर काय होऊ शकते? तो अनेक गोष्टी सांगतो.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत पंत करणार पुनरागमन, मोठे अपडेट समोर
उडता रिषभ पंत! यष्टीमागे हवेत झेप घेत अगदी अलगद पकडला चेंडू, व्हिडिओ व्हायरल
अश्विनसारखी गोलंदाजी शैली असलेल्या फिरकीपटूला बीसीसीआयनं धाडलं बोलावणं, कोण आहे तो?