२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आज भारताच्या श्रेयसी सिंगने नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णवेधी कामगिरी केली आहे.
तिने आज अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत तिचे आणि कॉक्सची ९६ पॉइंटवर बरोबरी झाली होती. त्यामुळे यांच्यामध्ये आणखी फेरी झाली. यात श्रेयसीने २ तर कॉक्सने १ पॉईंट मिळवला.
यामुळे श्रेयसीला सुवर्णपदक मिळवण्यात यश आले. तर कॉक्सला रौप्य पदावर समाधान मानावे लागले. स्कॉटलंडच्या लिंडा पिअर्सनने ८७ पॉईंट्स मिळवत कांस्यपदक जिंकले.
याचबरोबर या स्पर्धेत भारताची वर्षा वर्मनचे कांस्य पदक थोडक्यात हुकले. ती ८६ पॉईंट्स मिळवत चौथ्या स्थानावर राहिली.
श्रेयसीने याआधी २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. तसेच २०१७ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पिअनशिपमध्येही रौप्य पदक मिळवले आहे.
श्रेयसीने २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु तिला पदक जिंकण्यात अपयश आले होते. त्यानंतर तिने २०१४ च्या आशियाई गेम्समध्येही कांस्य पदकाची कमाई केली होती.
आज श्रेयसीने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे भारताच्या खात्यात १२ सुवर्णपदके झाले आहेत. याआधी नेमबाजीमध्ये जितू राय, हिना सिद्धू आणि मनू भाकरनेही सुवर्णपदक जिंकले आहे.