पुणे, 27 जुलै 2023: महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये साथियन ज्ञानसेकरन याने अनुभवी अचंता शरत कमलवर दणदणीत विजय मिळवला. दबंग दिल्ली टीटीसीने ९-६ अशा फरकाने गतविजेत्या चेन्नई लायन्सचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्ली फ्रँचायझीने ४२ गुणांसह अंतिम ४ संघांमध्ये आपली जागा पक्की केली, तर चेन्नई लायन्सनेही ४१ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित अल्टिमेट टेबल टेनिस लीगला प्रोत्साहन दिले आहे. २०१७ पासून सुरू झालेली लीग भारतातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे.
साथियनने ३-० अशा फरकाने शरतचा पराभव करून आपल्या फ्रँचायझीला आघाडी मिळवून दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू प्रत्येक गुण मिळवण्यासाठी आपला अनुभव पणाला लावताना दिसले. दबंग दिल्ली टीटीसीच्या खेळाडूने चुरशीची टक्कर देताना पहिला गेम गोल्डन गुणाने जिंकला.
आशियाई स्पर्धेची अनेक पदकं नावावर असलेल्या शरतने सुरुवात चांगली केली, परंतु साथियनने दुसऱ्या गेममध्येही आपल्या आक्रमक खेळाने ११-३ अशी बाजी मारली. तिसऱ्या गेममध्येही चांगली लढत पाहायला मिळाली, पण साथियनने ११-६ अशा विजयासह हा सामना जिंकला.
महिला एकेरीतील चुरशीच्या लढतीत जागतिक क्रमवारीमध्ये ३०व्या स्थानी असलेल्या यांग्झी लियू हिने श्रीजा अकुला हिच्यावर २-१ असा विजय मिळवला. पहिला गेम ११-८ असा जिंकून लियूने प्रतिस्पर्धीवर आघाडी घेतली तरी श्रीजाने खेळ उंचावत दुसरा गेम त्याच फरकाने आपल्या नावे करताना बरोबरी साधली. तिसर्या आणि निर्णायक गेममध्ये यांग्झी हिने ११-८ अशा फरकासह विजयावर शिक्कामोर्तब केले.
तिसऱ्या सामन्यात साथियन व बार्बोरा बालाझोव्हा या जोडीने मिश्र दुहेरीत शरत व यांग्झी यांचा २-१ असा पराभव करून फ्रँचायझीची आघाडी वाढवली. साथियन व बार्बोराने पहिले दोन गेम ११-७, ११-६ अशा फरकाने जिंकले, परंतु तिसऱ्या गेममध्ये शरत व यांग्झी यांनी ११-७ अशी बाजी मारली.
जागतिक क्रमवारीत ३२व्या क्रमांकावरील बेनेडिक्ट डुडाने २-१ अशा फरकाने जॉन पेर्सेनचा पराभव करून गतविजेत्यांचे सामन्यातील आव्हान कायम राखले होते. डुडाने ८-११, ११-६, ११-७ असा हा सामना जिंकला. महिला एकेरीच्या लढतीत बार्बोराने २-१ ( ११-६, ४-११, ११-९) असा प्राप्ती सेनवर विजय मिळवून दबंग दिल्ली टीटीसीला बाजी मारून दिली.
निकाल
चेन्नई लायन्स ६-९ दबंग दिल्ली टीटीसी
शरत कमल ०-३ साथियन ज्ञानसेकरन ( १०-११, ३-११, ६-११)
यांग्झी लियू २-१ श्रीजा अकुला ( ११-८, ८-११, ११-८)
शरत/यांग्झी १-२ साथियन/बार्बोरा ( ७-११, ६-११, ११-७)
बेनेडिक्ट डुडा २-१ जॉन पेर्सन ( ८-११, ११-६, ११-७)
प्राप्ती सेन १-२ बार्बोरा ( ११-६, ४-११, ११-९)