आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात नवा प्रकार असलेल्या टी२० क्रिकेटचा उदय झाल्यापासून, क्रिकेट हे फलंदाजांच्या सोयीचे झाल्याचे अनेकदा म्हटले जाते. नव्या पिढीतील सर्व फलंदाज वेगवेगळे फटके खेळून धावा बनवण्याचा प्रयत्न करत असतात. फलंदाज नवनवीन फटक्यांचा शोध लावून जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. भारताचा युवा यष्टीरक्षक व तडाखेबंद फलंदाज रिषभ पंत हा देखील अशा प्रकारचे अनेक फटके खेळत असतो. आता पंतच्या या फलंदाजीची शैलीविषयी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाजाने मोठे वक्तव्य केले आहे.
पंतने दिग्गज गोलंदाजांविरुद्ध खेळले होते रिव्हर्स स्कूप
इंग्लंड क्रिकेट संघ मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर आला असताना रिषभ पंतने इंग्लंडचा दिग्गज अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला अहमदाबाद कसोटीदरम्यान रिव्हर्स स्कूपचा फटका मारत चौकार वसूल केला होता. त्यानंतर झालेल्या टी२० मालिकेत सध्याचा सर्वोत्तम टी२० गोलंदाज असलेल्या जोफ्रा आर्चरविरुद्ध देखील त्याने अशा प्रकारचे फटके खेळले होते.
हा माझा अपमान असता
दक्षिण आफ्रिका दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने या मुद्यावर एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले, “रिषभ पंतने माझ्याविरुद्ध रिव्हर्स स्कूपचे फटके मारले असते तर, मी हा माझा अपमान समजला असता. याला उत्तर म्हणून मी त्याला पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा टाकला असता.” स्टेनने यादरम्यान पंतचे कौतुक देखील केले.
कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे पंत
रिषभ पंत सध्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने दोन महत्त्वपूर्ण खेळ्या करत भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे शानदार नेतृत्व देखील केले.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीचा ‘विराट’ विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पहिला आशियाई कर्णधार
‘त्या’ कृत्यामूळे घडले सिराजच्या माणुसकीचे दर्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल
जिगरबाज भारतीय महिला! तळाच्या फलंदाजांच्या चिवट खेळीमुळे इंग्लंडविरुद्धची ऐतिहासिक कसोटी अनिर्णित