जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 स्पर्धा म्हणून आयपीएल स्पर्धेने नावलौकिक मिळवला आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे 13 हंगाम पार पडले आहेत. या स्पर्धेत भाग घेणे हे अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. या स्पर्धेसाठी पाकिस्तान वगळता सर्व देशांचे खेळाडू सहभागी होत असतात. मात्र आयपीएलच्या 14 व्या हंगामात ‘स्टेनगन’ या नावाने प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज डेल स्टेन सहभागी होणार नाही. त्यानी ही माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. स्टेन यंदा आयपीएलच्या 14 व्या हंगामात बेंगलोरच नाही तर कोणत्याच संघाकडून खेळण्यासाठी सहभागी होणार नाही. त्याचबरोबर तो काही कालावधीसाठी आंतराष्ट्रीय सामन्यात ही भाग घेणार नाही. त्याला काही कालावधी ब्रेक घ्यायचा आहे.
डेल स्टेनने शनिवारी(2 जानेवारी) ट्विट करताना लिहले, “छोट्याशा संदेशाच्या माध्यमातून सांगत आहे की, मी यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीसाठी खेळणार नाही. मी दुसर्या कोणत्याही संघासाठी खेळण्याची योजना आखत नाही. फक्त काही कालावधीसाठी विश्रांती घेत आहे. मला समजून घेण्यासाठी धन्यवाद आरसीबी. नाही, मी निवृत्ती घेत नाही .”
Cricket tweet 🏏
Just a short message to let everyone know that I’ve made myself unavailable for RCB at this years IPL, I’m also not planning on playing for another team, just taking some time off during that period.
Thank you to RCB for understanding.
No I’m not retired. 🤙
— Dale Steyn (@DaleSteyn62) January 2, 2021
डेल स्टेनने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 95 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 97 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. या दिग्गज गोलंदाजाचा इकॉनॉमी दर 7 धावा प्रति षटकांपेक्षा कमी आहे. डेल स्टेन 2020 मधील आयपीएल स्पर्धेत फक्त 3 सामने खेळू शकला होता. यामध्ये त्याने फक्त 1 विकेट घेतली होती. त्याच्या खराब कामगिरीमुळे आरसीबी संघाने त्याचा अनेक सामन्यांमध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला नव्हता.
या गोलंदाजाची 2015 सालापासून कामगिरी ढासळत आली आहे. त्याने 2015 साली आयपीएलमध्ये 6 सामने खेळताना फक्त 3 विकेट्स घेतल्या होत्या. 2016 साली तो फक्त एक सामना खेळू शकला होता. त्यानंतर 2017 आणि 2018 मध्ये आयपीएल स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. त्याने 2019 मध्ये पुन्हा आयपीएल स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र 2 सामन्यातनंतर त्याला दुखापत झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“सिराजप्रमाणे नटराजनही कसोटी पदार्पण सामन्यात चमकेल”, ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून कौतुकाची थाप
धोनीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सुरेश रैना म्हणाला, “आमची भागीदारी पुन्हा सुरू होईल”
नव्या वर्षाचा नवा जोश! सिडनी कसोटीपुर्वी टीम इंडियाचा कसून सराव, पाहा व्हिडिओ