आयपीएलच्या सनराइझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर आपला संघसहकारी टी नटराजन याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाल्यामुळे खूप खुष आहे. नटराजनला वेगवान भारतीय गोलंदाज उमेश यादवच्या जागी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेशला दुखापत झाली होती. त्यामुळे उर्वरित २ कसोटी सामन्यांतून त्याने माघार घेतली आहे.
सिराजप्रमाणे नटराजनही यशस्वी होईल
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज वॉर्नर म्हणाला की, “भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजविषयी मला थोडीफार माहिती आहे. त्याचे रणजी ट्रॉफी क्रिकेटमधील प्रदर्शन खूप चांगले राहिले आहे. त्याच्यात सलग कित्येक षटके गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. सिराजने बॉक्सिंग डे सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील कामगिरीला पाहता मला वाटते की, नटराजनलाही संधी मिळाली तो अशाच प्रकारे यशस्वी होईल.”
कसोटी संघात निवड होत मिळाले मोठे बक्षीस
२० वर्षीय नटराजन आयपीएल २०२० पासून घरी गेलेला नाही. मर्यादित षटकांच्या भारतीय संघात त्याची निवड झाल्यामुळे तो संयुक्त अरब अमिरातीवरुन थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. त्यामुळे त्याला आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी कुटुंबासोबत उपस्थित राहता आले नाही. त्याच्या या त्यागामुळे वॉर्नरची त्याची प्रशंसा केली आहे.
वॉर्नर म्हणाला की, “मला वाटते नटराजनसाठी हे एक शानदार बक्षीस असेल. नेट गोलंदाज म्हणून तो येथे राहिला होता. याचमुळे त्याच्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी तो तिथे जावू शकला नाही. अशात मुख्य संघात त्याची निवड झाली आहे, जी त्याच्यासाठी खूप मोठी संधी ठरली आहे.”
टी२० प्रमाणे कसोटीतही दाखवू शकेल प्रतिभा
नटराजन टी२० क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी प्रतिभा दाखवू शकेल का? याविषयी विचारले असता वॉर्नर म्हणाला की, “मी याविषयी खात्रीने सांगू शकत नाही. परंतु त्याच्या रणजी ट्रॉफी मधील आकडेवारीला पाहून त्याच्या गोलंदाजी प्रतिभेची ओळख पटते. त्याच्याकडे चांगली लाइन आणि लेंथ आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सलग गोलंदाजी केल्यास काय करेल, हे सांगता येणार नाही.”
उमेशच्या जागी नटराजनला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सिडनी येथे ७ जानेवारीपासून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्याद्वारे तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-