मुंबई । दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानातील एका स्टँडला दिवंगत क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावावर पुढील बैठकीत चर्चा होईल अशी माहिती बुधवारी दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) सहसचिव राजन मनचंदा यांनी दिली.
भारताकडून 40 कसोटी सामने खेळणार्या चौहान यांचे रविवारी कोविड-19 मुळे मृत्यू झाला. त्यांनी डीडीसीएचे उपाध्यक्ष ते मुख्य निवडकर्ते अशी अनेक पदे भूषवली.
मनचंद यांनी बुधवारी पीटीआयला सांगितले की, “आम्ही आमच्या सदस्यांकडून मागणी केली आहे की डीडीसीएने चेतन जींचा सन्मान करण्यासाठी काही तरी केले पाहिजे. बहुतेक सदस्य स्टेडियमच्या एका स्टँडला त्यांचे नाव देण्यास तयार आहेत. पुढच्या बैठकीत मी हा विषय घेईन.”
डीडीसीच्या दोन गेटला वीरेंद्र सेहवाग आणि अजूम चोप्रा यांची नावे दिली आहेत. यासोबतच मन्सूर अली खान पटौदी, मोहिंदर अमरनाथ, बिशनसिंग बेदी आणि गौतम गंभीर अशी चार स्टँड आहेत, तर पवेलियनला सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले. दुसर्या महान खेळाडूच्या नावासाठी डीडीसीए जागा शोधण्यास सक्षम आहे की नाही हे पाहणे उत्सुक्याचा विषय असेल.
चौहान यांनी भारताकडून 1969 ते 1978 दरम्यान 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या आहेत. यात त्यांच्या 16 अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्यांनी 7 वनडे सामने खेळले असून यात 153 धावा केल्या आहेत.
1970 च्या दशकात त्यांची आणि सुनील गावसकरांची एक यशस्वी सलामी जोडी म्हणून ओळखली जात होती. त्यांनी 10 शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच भागीदारीत 3000 धावा केल्या आहेत. 1979 मध्ये ओव्हल येथे या दोघांनी केलेली भागीदारी संस्मरणीय मानली जाते. या जोडीने 213 धावांची भागीदारी रचली होती.
चेतन यांनी 179 प्रथम श्रेणी सामन्यांत 40.22 च्या सरासरीने 11143 धावा केल्या. ह्यामध्ये त्यांनी 21 शतके आणि 59 अर्धशतके झळकावली आहेत. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 1981 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.