पुणे । पुना क्लब यांच्या तर्फे आयोजित एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या धुत ट्रान्समिशन पुना क्लब करंडक 3लाख रकमेच्या पुरुष व महिला अखिल भारतीय मानांकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूषांच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
पुना क्लब, लेडीज क्लब व आरसीबी क्लब टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या गटात उपांत्य फेरीत बिगरमानांकित महाराष्ट्राच्या अन्वीत बेंद्रे याने काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या तामिळनाडूच्या सुरेश दक्षिणेश्वरचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(8)असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 1तास 50मिनिटे चाललेल्या या सामन्यात अन्वीतने पहिल्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये सुरेशची सर्व्हिस रोखली.
या सेटमध्ये अन्वीतने वर्चस्व राखत सुरेशची सर्व्हिस पाचव्या गेममध्ये रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत अन्वीतने हा 6-2असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोघांनी आपापली सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. अन्वीतने आपला खेळ उंचावत नेट जवळून आक्रमक खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी पुन्हा आपापल्या सर्व्हिस राखल्या व सेट टायब्रेकमध्ये गेला.
टायब्रेकमध्ये अन्वीतने चलाखीने खेळ करत लाईनवरून बॅकहॅंडचे फटके मारत टायब्रेक 7-6(8)असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या कुणाल आनंद याने तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या धुव सुनिशचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(2) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत अन्वीत बेंद्रे समोर कुणाल आनंदचे आव्हान असणार आहे.
महिलांच्या गटात उपांत्य फेरीत सातव्या मानांकित तेलंगणाच्या निधी चिलुमुला हिने अव्वल मानांकित गुजरातच्या वैदेही चौधरीचा टायब्रेकमध्ये 7-6(7), 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली.चौथ्या मानांकित आंध्रप्रदेशच्या सोहा सादिक हिने दुसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या नित्याराज बाबुराजचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
दुहेरीत उपांत्य फेरीत पुरुष गटात अन्वीत बेंद्रेने रोहन भाटियाच्या साथीत शशांक तीर्थ माचेरला व गुंजन जाधव यांचा सुपरटायब्रेकमध्ये 4-6, 6-2, 12-10 असा पराभव केला. परिक्षित सोमाणी व सुरेश दक्षिणेश्वर यांनी अरमान भाटिया व ईशक इकबाल यांचा 6-2, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला गटात श्राव्या चिलकलापुडी व वैदेही चौधरी या जोडीने अनुशा कोंडावती व साई देदीप्या जोडीवर 6-1, 6-1 असा एकतर्फी विजय मिळवला. महिला गटात श्राव्या चिलकलापुडी व वैदेही चौधरी यांनी अनुशा कोंडावती व साई देदीप्या यांचा 6-1, 6-1असा सहज पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: एकेरी: पुरुष गट:
अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)वि.वि.सुरेश दक्षिणेश्वर(तामिळनाडू)6-2, 7-6(8);
कुणाल आनंद(दिल्ली)(2)वि.वि.ध्रुव सुनिश(महाराष्ट्र)(3)6-2, 7-6(2);
उपांत्य फेरी: एकेरी: महिला गट:
निधी चिलुमुला(तेलंगणा)(7) वि.वि वैदेही चौधरी(गुजरात)(1) 7-6(7), 6-4
सोहा सादिक(आंध्र प्रदेश)(4) वि.वि नित्याराज बाबुराज(तमिळनाडू)(2) 6-3, 6-2;
दुहेरी: पुरुष गट: उपांत्य फेरी:
अन्वीत बेंद्रे(महाराष्ट्र)/रोहन भाटिया(3) वि.वि.शशांक तीर्थ माचेरला(तेलंगणा)/गुंजन जाधव(महाराष्ट्र) 4-6, 6-2, 12-10;
परिक्षित सोमाणी/सुरेश दक्षिणेश्वर(तामिळनाडू)(2)वि.वि.अरमान भाटिया(महाराष्ट्र)/ईशक इकबाल(पश्चिम बंगाल)6-2, 7-5;
महिला गट:
श्राव्या चिलकलापुडी(तेलंगणा)/वैदेही चौधरी(गुजरात)वि.वि.अनुशा कोंडावती/साई देदीप्या(तेलंगणा) 6-1, 6-1;
हुमेरा शेख(तेलंगणा)/सारा यादव(मध्यप्रदेश) वि.अवंतिका साई रेवनूर(तामिळनाडू)/आरती मुनियन(तामिळनाडू)6-3, 6-4