भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर रिषभ पंत सध्या भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक आहे. टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात भारताने ९ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात रिषभ पंत यष्टीरक्षक होता. त्याने सामन्यादरम्यान असे काही केले, ज्यामुळे त्याची तुलना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत होत आहे.
आयसीसीने पंतने केलेल्या या कृतीचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. चाहते या व्हिडिओवर भरमसाठ कमेंट्स करत आहेत.
ही घटना नामिबियाच्या डावाच्या ९ व्या षटकात घडली. या षटकात राहुल चाहर गोलंदाजी करायला आला होता. त्याच्या पहिलाच चेंडू नामिबियाचा फलंदाज लोफ्टी इटॉनने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. त्याने या चेंडूवर दोन धावा घेतल्या. मैदानात त्या दिशेला एकही खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित नव्हता. खेळाडू उपस्थित नसल्यामुळे स्वत: यष्टीरक्षक पंत हा चेंडू पकडण्यासाठी मैदानात धावला. त्याने हा चेंडू पकडला आणि सरळ स्टम्सच्या दिशेने फेकला. त्याने हा चेंडू स्टम्पकडे फेकताना एकदाही मागे पाहिले नाही.
पंत चेंडू पकडण्यासाठी गेल्यामुळे रोहित शर्मा स्टम्पजवळ आला होता. रोहितने हा चेंडू पकडला. ही घटना घडल्यानंतर चाहते पंतची तुलना महेंद्रसिंग धोनीसोबत करू लागले आहेत. पंतने स्टम्पकडे न पाहता चेंडू फेकून धोनीची आठवण करून दिली, असे चाहते म्हणत आहेत. दरम्यान, धोनीने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा अशाप्रकारे स्टम्पकडे न पाहता थ्रो केला आहे आणि त्यापैकी बहुतांश वेळा समोरचा फलंदाज धावबाद झाला आहे.
https://www.instagram.com/p/CWBNB2flzPN/
दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट्स गमावले आणि १३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ह१३३ धावांचे लक्ष्य १५.२ षटकात आणि एका विकेटच्या नुकसानावर गाठले. यामध्ये भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी महत्वाचे योगदान दिले. तसेच गोलंदाजीमध्ये रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहा यांनी किफायतशीर गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅटला पाय लागताच रिषभ पंतने केली मन जिंकणारी कृती, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
रोहित शर्मा का होऊ शकतो भारताच्या टी२० संघाचा उत्तम कर्णधार, ‘ही’ आहेत ३ महत्त्वाची कारणं
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद, तर शॉ, पड्डीकललाही संधी