विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने टी २० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने टी २० क्रिकेटमध्ये ४०० बळी घेण्याचा टप्पा पार केला आहे. टी २० त ४०० बळी घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
त्याने सध्या चालू असलेल्या बिग बॅश लीग मध्ये काल पार पडलेल्या होबार्ट हरिकेन्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड यांच्यातील सामन्यात मेलबर्न रेनेगेड संघाकडून खेळताना २८ धावात ५ बळी घेऊन हा विक्रम रचला. तसेच टी २०त ५ बळी घेण्याची ही त्याची दुसरीच वेळ आहे.
त्याच्या या सामन्यातील कामगिरीमुळे होबार्ट हरिकेन्स संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६४ धावाच करता आल्या. मेलबर्न संघाने या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना १८.३ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज विजय मिळवला.
ब्रावोच्या पाठोपाठ टी २० त सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत श्रीलंकेचा लसिथ मलिंगा दुसरा तर सुनील नारायण तिसरा गोलंदाज आहे.
टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:
१. ड्वेन ब्रावो – ४०० बळी
२. लसिथ मलिंगा- ३३१ बळी
३. सुनील नारायण- ३०७ बळी
४. शाकिब अल हसन- २९२ बळी
५. शाहिद आफ्रिदी- २८७ बळी