इंग्लंड संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून दोन्ही संघात गुरुवारपासून (१४ जानेवारी) पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव ४२१ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडच्या या भल्यामोठ्या धावसंख्येत कर्णधार जो रुटचा मोठा वाटा राहिला. रुटने या सामन्यात आतिशी द्विशतकी खेळी करत अनेक विक्रमांची आपल्या नावे नोंद केली आहे.
इंग्लंडचा पहिला कर्णधार व फलंदाज
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत या ३० वर्षीय शिलेदाराने पैसावसूल फलंदाजी प्रदर्शन केले. ३२१ चेंडूत ७१.०३च्या स्ट्राईक रेटने त्याने २२८ धावा केल्या. यात त्याच्या १८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अखेर श्रीलंकाचा गोलंदाज दिलरुवान परेरा याने रुटला झेलबाद केले.
असे असले तरी, द्विशतकी कामगिरी करत रुट श्रीलंकाविरुद्ध द्विशतक करणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार ठरला आहे. सोबतच कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून २ द्विशतके करणारा इंग्लंडचा पहिला आणि एकमेव कर्णधार बनण्याचा किर्तीमानही त्याच्या नावे झाला आहे. यापुर्वी हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध २०१९ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्त्व करतेवेळी त्याने द्विशतकी कामगिरी केली होती.
याबरोबरच श्रीलंकाच्या मैदानावर द्विशतकाची नोंद करणारा तो इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
कसोटी कारकिर्दीतील चौथे द्विशतक
विशेष म्हणजे, श्रीलंकाविरुद्ध केलेले द्विशतक हे रुटचे कसोटी कारकिर्दीतील पहिले-वहिले द्विशतक नसून तब्बल चौथे द्विशतक होते. २०१२ साली भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या या धुरंधरने श्रीलंकाविरुद्ध २ द्विशतके केली आहेत. यापुर्वी जून २०१४ मध्ये श्रीलंकाविरुद्ध त्याने द्विशतक करण्याचा पराक्रम केला होता. याबरोबरच पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध त्याने प्रत्येकी १ द्विशतक केले होते.
इंग्लंडकडून सर्वाधिक द्विशतके करणारा चौथा फलंदाज
यासह इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारा रुट चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी माजी दिग्गज लिओनार्ड हटन, ऍलिस्टर कूक आणि वॅली हेमन्ड यांनी कसोटीत ४ किंवा त्यापेक्षा द्विशतांची नोंद केली आहे. हेमन्ड यांनी इंग्लंड कसोटी संघाचे प्रतिनिधित्त्व करताना सर्वाधिक ७ द्विशतके केली होती. तर ऍलिस्टर आणि हटन यांनी अनुक्रमे ५ व ४ द्विशतके केली होती.
कसोटीतील ८००० धावा पूर्ण
एवढेच नव्हे तर, श्रीलंकाविरुद्ध २०० हून अधिक धावा करणारा रुट कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावांचा आकडा गाठणारा इंग्लंडचा सातवा फलंदाज आहे. ९८ कसोटी सामन्यातील १७८ डावात फलंदाजी करताना त्याने ८०५१ धावा केल्या आहेत. त्याच्यापुर्वी ऍलिस्टर कूक, ग्राहम गूच, ऍलेक्स स्टिव्हर्ट, डेविड गोवर, केविन पीटरसन, जॉफरी बॉयकॉट यांनी ८००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
इंग्लंडकडून कसोटीत ८००० धावा करणारे फलंदाज
ऍलिस्टर कूक- १२४२७ धावा
ग्राहम गूच- ८९०० धावा
ऍलेक्स स्टिव्हर्ट- ८४६३ धावा
डेविड गोवर- ८२३१ धावा
केविन पीटरसन- ८१८१ धावा
जॉफरी बॉयकॉट- ८११४ धावा
जो रुट- ८०५१ धावा
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs SA : कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ जाहीर; तब्बल ८ खेळाडूंना डच्चू