भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघेही सध्या खराब फाॅर्मशी झगडत आहेत. इंग्लंडमध्ये सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही. त्यानंतर सध्या लॉर्ड्समध्ये चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही रहाणे आणि पुजाराने पुन्हा निराशाजनक कामगिरी केली. त्यांच्या या खराब फॉर्ममुळे त्यांच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कसोटी संघाच्या मध्यक्रमातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या दोन खेळाडूंना संघातून बाहेर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी या गोष्टीला असहमती दाखवली आहे.
गावसकरांनी सोनी स्पोर्टस वाहिनीवर चर्चा करताना म्हटले की, रहाणे आणि पुजारा लो प्रोफाइल खेळाडू आहेत, त्यामुळे यांच्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. जर यांना संघातून काढून टाकले तरीही ते गोंधळ करणार नाहीत. ते म्हणाले की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात रहाणेने भारतासाठी एका डावात सर्वाधिक ४९ धावा केल्या होत्या. मुळात इंग्लंड दौऱ्यात कोणत्याच भारतीय खेळाडूने जास्त धावा केल्या नाहीत. पण ईमानदारीने सांगायचे झाल्यास फक्त याच खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण त्यांची छवी तेवढी मोठी नाही. पण खरे रहाणे आणि पुजारा असे खेळाडू आहेत, ज्यांना संघाबाहेर केले तरी ते कसल्याही प्रकारचा गोंधळ करणार नाहीत.”
रहाणे – पुजाराचे खराब प्रदर्शन
मेलबर्न कसोटीतील शतकानंतर रहाणे फलंदाजीत काही कमाल करू शकला नाही. मागच्या १५ डावांमध्ये त्याने केवळ १ अर्धशतक केले आहे. रहाणेने त्याचे शेवटचे अर्धशतक फेब्रुवारी २०२१ मध्ये केले होते. म्हणजेच मागच्या ८ डावात तो अर्धशतकही करू शकला नाही. तरीही गावसकरांनी रहाणेला पाठिंबा दिला आहे.
गावसकर पुढे बोलताना म्हणाले, “हो. त्याने जास्त धावा केल्या नाही. हा चिंतेचा विषय आहे. पण जास्त चिंतेची गोष्ट त्याच्या कौशल्यातील बिघाड असायला हवी. असेच काही पुजारासोबतही झाले पाहिजे. अजिंक्य रहाणे ज्याप्रकारे आउटस्विंग चेंडूवर बाद होत आहे ती चिंतेची गोष्ट आहे. पण त्याच्यावर कोण काम करत आहे? यासाठी सहाय्यक कर्मचारीही आहेत, मग त्यांना का काही म्हटले जात नाही. जर तुम्ही एकाच प्रकारे सारखे बाद होत असाल म्हणजे तुमच्या कौशल्यात काहितरी उणीव आहे आणि तिथे असे लोकही आहेत ज्यांनी तुमची मदत केली पाहिजे.”
रहाणेप्रमाणेच चेतेश्वर पुजाराही सध्या खराब फाॅर्मात आहे. तो मागच्या १० कसोटी डावांत एकदाही अर्धशतक करू शकला नाही. २०२० पासून पुजारा, रहाणे आणि विराट यांची कसोटीत सरासरी ३० पेक्षा कमी आहे. पुजाराने मागच्या १३ कसोटी सामन्यांतील २३ डावांमध्ये २५.०९ च्या सरासरीने ५५२ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने मागच्या १३ कसोटी सामन्यांतील २२ डावांत २५.७६ च्या सरासरीने ५४१ धावा केल्या आहेत. विराटने मागच्या १० कसोटी सामन्यांमध्ये १६ डावांत ३८६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मैं तो नागिन नागिन… लॉर्ड्सच्या बाल्कनीत कोहलीने धरला ठेका, सहकाऱ्यांना हसू अनावर
परदेशी मैदानांवर यष्टीरक्षक रिषभचाच बोलबाला, ३७ धावांच्या खेळीसह मोडलाय धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड