पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बाबरला संघातून ड्रॉप केल्यानंतर पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वात भूकंप आला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे अनेक माजी खेळाडू बाबरच्या समर्थनार्थ समोर आले आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं बाबरला वगळण्याचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचं म्हटलंय. वॉननं लिहिलं की, बाबरनं ब्रेक मागितला असेल तर ठीक आहे, मात्र जर त्याला वगळलं असेल तर हा मूर्खपणाचा निर्णय आहे. भारताचा माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यानं देखील बाबर आझमचं समर्थन केलं. बाबरनं कसोटीच्या शेवटच्या 18 डावांमध्ये एकही अर्धशतक केलं नाही. मात्र आकाश चोप्राच्या मते, बाबरला वगळणं हा या समस्येवरचा उपाय नाही. तो मैदानाबाहेर बसून आपला फॉर्म परत मिळवू शकत नाही, असं चोप्रा म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ब्रॅड हॉग यानं देखील बाबर आझमला पाठिंबा दिला. “बाबरच्या खराब फॉर्मची तुलना कोहलीच्या खराब फॉर्मशी करण्यात अर्थ नाही”, असं त्याचं मत आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज सईद अन्वर बाबरला पाठिंबा देताना म्हणाला, “हा काळ सुद्धा निघून जाईल. तू खंबीर रहा. असं प्रत्येकाच्या कारकिर्दीत घडत असतं. तू पुन्हा उसळी घेशील.”
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी देखील बाबर आझम तसेच शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना पाठिंबा दिला. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाले, “निवड समितीनं सांगितलं की या तिन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हे म्हणण्याचा योग्य मार्ग होता. त्यांना वगळण्यात आलं, असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. तो (बाबर) आमचा हिरो आहे आणि त्याच्या कारकिर्दीत चढ-उतार येतच राहतील.”
हेही वाचा –
फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सलग चौथं शतक ठोकलं, मात्र अद्यापही भारतीय संघात जागा मिळाली नाही!
गौतम गंभीरचं वादाशी जुनं नातं, समाजसेवेतही दिलंय योगदान; जाणून घ्या भारताच्या हेड कोचचे माहित नसलेले किस्से
जम्मू-काश्मीरच्या खेळाडूचा धमाका! रणजी ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज