जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४९२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर द. आफ्रिकेने ४ सामन्यांची कसोटी मालिकाही ३-१ अशी खिशात घातली.
या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आज एक खास विक्रम रचला आहे. ऑस्ट्रलियाविरुद्ध मायदेशात आणि परदेशातही मालिका जिंकणारा डु प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा पहिला कर्णधार बनला आहे.
त्याने कर्णधार म्हणून २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियातच २-१ असा विजय मिळवला होता. असा विक्रम करणारा तो १९४५ नंतरचा जगातील एकूण ७ वा कर्णधार आहे.
डुप्लेसिसने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेचे २३ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. यात त्याने एकूण १५ विजय आणि ५ पराभव पाहिले आहेत. तसेच ३ सामने अनिर्णित राखले आहेत.
१९४५ नंतर असा विक्रम करणारे कर्णधार:
सर लिओनार्ड हटन
माईक ब्रेअर्ली
क्लाइव्ह लॉइड
विव रिचर्ड्स
जेरेमी कॉनी
अँड्रयू स्ट्रॉस
फाफ डुप्लेसिस