मुंबई, दिनांक 4 मार्च ः हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील उपांत्य फेरीसाठी एफसी गोवा संघाच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता वाटणे स्वाभाविकच आहे. मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्यांची लढत आहे. मोसमात एफसी गोवा संघाची वाटचाल चमकदार झाली आहे. गेल्या मोसमात त्यांची वाटचाल उपांत्य फेरीत खंडित झाली. यावेळी यापेक्षा जास्त चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांनी बाळगली असून त्यांना खुप उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. याचे कारण एफसी गोवाने मोसमाची सांगता दमदार केली आहे.
आता मुंबईच्या आव्हानाला सामोरे जाताना त्यांच्या चाहत्यांमध्ये आशा आणि उत्सुकतेचे वातावरण आहे. साखळीत दोन टप्यांत मिळवून एफसी गोवाने मुंबईचा 7-0 असा धुव्वा उडविला. त्यामुळे गेल्या मोसमाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याचा विश्वास त्यांना वाटतो.
साखळीत एफसी गोवाने यापूर्वीच लक्षणीय प्रगती केली आहे. सर्वाधिक कमी गोल पत्करण्याच्या क्रमवारीत नॉर्थइस्ट युनायटेड एफसीनंतर त्यांचा दुसरा क्रमांक आहे. त्यांनी तब्बल आठ क्लीन-शीट्स राखल्या आहेत. 18 सामन्यांत त्यांच्याविरुद्ध केवळ 20 गोल झाले आहेत. सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव फळी भक्कम करण्याच्यादृष्टिने ठोस प्रयत्न झाले आहेत.
एफसी गोवाच्या आक्रमणातील भेदकतेचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. त्यांनी 36 गोलांचा पाऊस पाडला आहे, जे प्रमाण सर्वाधिक आहे. यात फेरॅन कोरोमीनास याने 15 गोलांसह सर्वाधिक वाटा उचलला आहे.
लॉबेरा यांनी सांगितले की, या मोसमापूर्वी बचाव फळीत आमच्यासमोर काही समस्या होत्या, पण त्यात आता सुधारणा झाल्याचे वाटते. याशिवाय कामगिरीत सातत्य राखणे मला महत्त्वाचे वाटते. ते साध्य केले आहे असेही वाटते. संघ वेगवेगळ्या टप्यातून जात असतात, पण संपूर्ण मोसमात आम्ही चांगले संतुलन राखू शकलो ही फार उत्तम गोष्ट ठरली.
स्पेनच्या लॉबेरा यांनी बचाव फळीत मौर्तडा फॉल आणि कार्लोस पेना यांची जोडी जमविणे टर्निंग पॉईंट ठरले. या जोडीने लिगमधील सर्वाधिक भक्कम भागिदारी निर्माण केली.
बचावात डावीकडे मंदार राव देसाई याने आपली भूमिका चोख बजावण्यास सुरवात केली. गेल्या मोसमात लॉबेरा यांनी या तरुण खेळाडूला तात्पुरता लेफ्ट-बॅक म्हणऊन संधी दिली. मंदारने मग ही स्थिती आपल्या हक्काची म्हणून निर्माण केली. उजवीकडे सुद्धा सेरीटॉन फर्नांडीस याने बरीच मजल मारली.
बचाव फळीतील चौकडीने भक्कम पथक बांधले असतानाच त्यामुळे गोलरक्षणातही जास्त दक्ष पर्याय निर्माण होऊ शकला. गेल्या मोसमात लक्ष्मीकांत कट्टीमनी याने धक्कादायक चुका केल्यामुळे गोल झाले होते. गोलरक्षकात बदल करणे लॉबेरा यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरले. तरुण गोलरक्षक महंमद नवाझ याचा प्रभाव विलक्षण पडला आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या अनुभवी नवीन कुमार याने नवाझचा सहाय्यक म्हणून सक्षम पर्याय निर्माण केला.
यंदा बचावात कडेकोट सुधारणा केल्याबद्दल लॉबेरा यांना श्रेय द्यावे लागेल. आक्रमण हा बाचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्याची त्यांची विचारसरणी सर्वपरिचीत आहे. आता बचावही तेवढाच बक्कम झाल्यामुळे आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विश्वास एफसी गोवाला निर्माण झाला आहे.