गोवा । एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात अंतिम फेरीत धडक मारली. घरच्या मैदानावर दुसऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्याच्या साामन्यात मुंबई सिटीकडून गोव्याचा घरच्या मैदानावर एकमेव गोलने पराभव झाला, पण मुंबईविरुद्ध मुंबईत मिळविलेल्या धडाकेबाज विजयाच्या जोरावर गोव्याने 5-2 अशा अॅग्रीगेटवर आगेकूच केली.
रॅफेल बॅस्तोसच्या गोलमुळे सहाव्याच मिनिटाला खाते उघडल्यानंतर मुंबईला आणखी भर घालता आली नाही. त्यामुळे प्रचंड पिछाडी भरून काढण्याचे अशक्यप्राय आव्हान त्यांना पेलता आले नाही. यात गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याने महत्त्वाची कामगिरी बजावली.
मुंबईतील पहिल्या टप्याच्या सामन्यातच गोव्याने 5-1 असा विजय मिळवित अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास नक्की केला होता. नंतर पराभव होऊनही गोव्याच्या वाटचालीवर परिणाम झाला नाही.
आता येत्या रविवारी (दिनांक 17 मार्च) मुंबईत बेंगळुरू एफसीविरुद्ध गोव्याची निर्णायक लढत होईल. बेंगळुरू एफसीने नॉर्थइस्ट युनायटेडला रोखून सलग दुसऱ्या मोसमात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
मुंबईने सुरवात जोरदार केली. सहाव्या मिनिटालाच त्यांनी खाते उघडत स्थानिक प्रेक्षकांना धक्का दिला. यात गोव्याच्या अहमद जाहौह याची ढिलाई कारणीभूत ठरली. मध्य क्षेत्रात त्याचा पास चुकल्यामुळे अरनॉल्ड इसोकोला संधी मिळाली. डावीकडे बॅस्तोस मोकळा दिसताच त्याने अचूक पास दिला. मग बॅस्तोसने गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याला चकवित गोल केला.
गोव्याला दुसऱ्याच मिनिटाला फ्री किक मिळाली होती. मिलन सिंगने हवेतून येणाऱ्या चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात ह्युगो बौमौस याला बॉक्सलगत ढकलले. त्यामुळे पंच आर. व्यंकटेश यांनी गोव्याला फ्री किक दिली. ब्रँडन फर्नांडीस याने घेतलेल्या फ्री किकवर मात्र मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने चेंडू आरामात अडविला.
सातव्या मिनिटाला बौमौसचा पास चुकला आणि बॅस्तोसने संधी साधली. त्याने लांबून प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती. पहिला कॉर्नर मुंबईने मिळविला. पाऊलो मॅचादो याने उजवीकडून घेतलेल्या कॉर्नरवर चेंडू बॉक्समध्ये येताच मोडोऊ सौगौ याने उडी गेत हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती.
गोव्याला 17व्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. ब्रँडन फर्नांडीसने उजवीकडून आगेकूच केली, पण मुंबईच्या जॉयनर लॉरेन्कोने मैदानावर घसरत चेंडू बाहेर घालविला. त्यामुळे गोव्याला मिळालेला कॉर्नर मात्र मुंबईच्या बचाव फळीने रोखला.
जॅकीचंद सिंगने 20व्या मिनिटाला बौमौसला सुंदर पास दिला, पण ही चाल पुढे सरकण्यापूर्वीच जॅकीचंदला ऑफसाईड ठरविण्यात आले.
नवीनने 23व्या मिनिटाला गोव्याला तारले. बॅस्तोसने सौगौ याला अचूक पास दिला. सौगौने मौर्तडा फॉल याला चकवून चेंडूनेटच्या दिशेने मारला, पण नवीनने तो रोखला. मौर्तडानेही चटकन सावरत नवीनला साथ दिली. मुंबईने त्यावेळी हँडबॉलचे अपील केले, पण पंचांनी ते फेटाळले.
ब्रँडनने 26व्या मिनिटाला उजवीकडून क्रॉस शॉट मारला, पण सौविक चक्रवर्ती याने छातीने चेंडू अडवित तो बाहेर घालविला. त्यामुळे गोव्याला कॉर्नर मिळाला, जो ब्रँडनने घेतला. त्यातून सौगौने बचाव करीत मुंबईचे क्षेत्र सुरक्षित राखले.
गोव्याचा हुकमी स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने उत्तरार्धात प्रयत्न केला, पण तो नेहमीसारखे फिनिशिंग साधू शकला नाही. या सत्रात ब्रँडनने एक कॉर्नरही वाया घालविला.