सेन्चुरियन। भारताला आज दक्षिण आफ्रिकेने १३५ धावांनी पराभूत करून ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताला मिळालेल्या या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
संघाचा पूर्ण वेळ कर्णधार म्हणून विराटने पहिल्यांदाच मालिका गमावली आहे. त्याच्या ३ वर्षांच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीत विराटने क्रिकेटच्या तीनही प्रकारातली एकही मालिका गमावली नव्हती.
विराटने भारताचे जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी कर्णधारपद स्वीकारले होते. पण त्या मालिकेत एम एस धोनीने २ सामन्यात नेतृत्व केले होते. ही ४ सामन्यांची मालिका भारताने २-० अशी गमावली होती.
त्यानंतर मात्र विराट कोहली भारताचा कसोटीतील पूर्ण वेळ कर्णधार होता. मागीलवर्षी जानेवारी २०१७ मध्ये धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून कर्णधार पद सोडले. त्यानंतर विराटकडे भारताचे सर्व प्रकारच्या क्रिकेटचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
भारतीय संघ १ जानेवारी २०१५ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३२ कसोटी सामने खेळला असून त्यात केवळ २ सामन्यात संघ पराभूत झाला होता. परंतु १ जानेवारी २०१८ पासून केवळ १७ दिवसांत संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.