पुणे । सिमन्स, टिएटो या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत सिमन्स संघाने अॅकसेंचर संघावर दोन गडी राखून मात केली. सिमन्स संघाने अचूक गोलंदाजीच्या जोरावर अॅकसेंचरचा डाव ९ बाद १११ धावांत रोखण्यात यश मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना सिमन्सचे आघाडीचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. यानंतर मधल्या फळीतील अतुल पवारने २१ चेंडूंत नाबाद ३८ धावा करून सिमन्सला विजय मिळवून दिला.
यानंतर अखेरपर्यंत रोमहर्षक झालेल्या दुस-या लढतीत टिएटो संघाने कॉग्निझंट संघावर पाच धावांनी विजय मिळवला. टिएटो संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कॉग्निझंट संघाला ७ बाद १३७ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक –
१) अॅकसेंचर- २० षटकांत ९ बाद १११ (स्नेहल खामणकर २९,सुहास देव २३, श्रेयस खांडेकर २२, सौम्या एम. २-२६, दीपककुमार २-२७) पराभूत वि. सिमन्स – १७.३ षटकांत ८ बाद ११२ (अतुल पवार नाबाद ३८, नमन शर्मा २०, तुषार अत्तरडे २०, आकाशसिंग ४-३०, चिन्मय कर्वे २-२०). सामनावीर – अतुल पवार
२) टिएटो- २० षटकांत ६ बाद १४२ (अभिषेक कौशिक ४२, धनाजी काळके २५, प्रशांत दुधाणे २१, कुणाल ए. ३-१४) वि. वि. कॉग्निझंट – २० षटकांत ७ बाद १३७ (करण केसरकर ३१, नितेश सप्रे २९, मिन्हाज अली २७, वैभव राजुरकर २४, अंकित जैन १-१८, धनाजी १-१३). सामनावीर – अभिषेक कौशिक