गुवाहाटी। ऑलिंपिक पात्रतेचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या पाच तिरंदाजांनी शनिवारी तिस-या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत रिकर्व्हच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी कंपाऊंड प्रकारात ईशा पवारने हॅटिट्रककडे दमदार पाऊल टाकला १७ वर्षांखालील गटातून उपांत्य फेरी गाठली.
गुवाहटी येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ साळुंके (१७ वर्षांखालील), मयूर रोकडे, सचिन वेदवान, टिशा संचेती, साक्षी तोटे यांनी २१ वर्षांखालील गटातून रिकर्व्हमध्ये आपली आगेकूच कायम राखली.
त्याचवेळी कंपाऊंड प्रकारात गतविजेता प्रथमेश जांवकर, स्वामी दळवी, करण सलोक (१७ वर्षांखालील), तर वेदांत वानखेडे, तुषार फडकरे, सौमित्र घोष, मधुरा धामणगांवकर (२१ वर्षांखालील) यांना अपयश आले.
इस्लामपूर बहे येथील मयूर रोकडे याने मध्य प्रदेशाच्या अमित यादव आणि आसामच्या केनिसाओ थेउनुवो याचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. उपांत्य फेरीत त्याची गाठ महाराष्ट्राच्याच सचिन वेदवानशी पडेल. त्याने हरियाणाच्या राहुलचा ६-४ आणि अव्वल मानांकित सचिन गुप्ता याचा ७-५ असा पराभव केला.
याच वयोगटात मुलींमध्ये टिशा संचेती हिने उपांत्य फेरी गाठताना झारखंडच्या बसंती बरुआचा ७-१, उत्तर प्रदेशाच्या नमिता वर्मा हिचा ६-० असा पराभव केला. महाराष्ट्राच्याच साक्षी तोटे हिनेही अचूक लक्ष्य वेध करताना चंडिगडच्या केमलिन लोप्चा हिचा ६-४ आणि झारखंडच्या कोमलिका बारी हिचा ७-३ असा पराभव केला. कोमलिका यंदाही युवा जागितक स्पर्धेची सुवर्णपदक विजेती आहे.
कंपाऊंड प्रकारात अन्य तिरंदाज अपयशी ठरत असताना १७ वर्षांखालील गटातून ईशा पवारने सफाईदार कामगिरीसह उपांत्य फेरी गाठली. तिने हर्षिया चौधरी (१४०-११५) आणि निकिता डगर (१४३-१३९) या मध्य प्रदेशाच्या खेळाडूंचा पराभव केला. ईशाने या कामगिरीसह हॅट्ट्रिकच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.