इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाचे रणशिंग फुंकले गेले असून, आता लिलावात असणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादीही जाहीर झाली आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण, आता ५९० खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे. या अंतिम निवड झालेल्या खेळाडूंमध्ये २ कोटींची मूळ किंमत असलेले ४८ खेळाडू आहेत. तर २० खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत १.५ कोटी ठेवली आहे. तसेच ३४ खेळाडू १ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात सहभागी होतील. (IPL 2022 Player Auction list announced)
या भव्यदिव्य लिलावात मात्र काही खेळाडू असे असतील जे आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी लिलावात उतरले आहेत. काही हंगामांपूर्वी आयपीएलचे झळाळते तारे असणाऱ्या या खेळाडूंनी आपल्यावर लिलावात बोली लावली जावी म्हणून, चक्क आपली मूळ किंमत कमी केली आहे. आज आपण त्याच खेळाडूबाबत जाणून घेणार आहोत.
१) केदार जाधव (Kedar Jadhav)
मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला महाराष्ट्राचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव हादेखील या लिलावात उतरणार आहे. सततच्या दुखापती व खराब फॉर्म यामुळे तो जवळपास दोन वर्षापासून भारतीय संघात खेळलेला नाही. त्याचवेळी मागील वर्षी तो खेळलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला रिटेन देखील केले नाही. मागील वर्षी हैदराबाद संघाने केवळ बेस प्राईसमध्ये म्हणजे दोन कोटी रुपयांत त्याला खरेदी केले होते. मात्र, यावर्षी केदारने आपली बेस प्राईस कमी केली आहे. यावर्षी त्याची बोली १ कोटीवरून सुरू होईल.
२) कुलदीप यादव (Kuldeep Yadav)
भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हादेखील या लिलावात आपले नशीब आजमावेल. प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतीच त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या मेगा लिलावात त्याची बोली १ कोटीपासून सुरू होईल. मात्र, कुलदीप अखेरच्या वेळी जेव्हा (२०१८) लिलावात उतरला होता तेव्हा त्याची किंमत १.५ इतकी होती. त्यामुळे यावेळी तो आपली किंमत कमी करून लिलावात सहभागी होईल.
३) जयदेव उनाडकत (Jaydev Unadakat)
आयपीएल २०१८ व २०१९ मध्ये अनुक्रमे ११ आणि ८ कोटी रुपये मिळवणारा भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत हा सध्या भारताचे कोणत्याच प्रकारात प्रतिनिधित्व करत नाही. तसेच मागील काही आयपीएल हंगामात त्याची कामगिरीही ढासळली आहे. त्यामुळे एकेकाळी कोट्यावधींची बोली लागलेला जयदेव या वर्षी केवळ ७५ लाखापासून आपल्या बोलीची सुरुवात करेल. २०२० मध्ये अखेरच्या वेळी तो जेव्हा लिलावात सहभागी झाला होता तेव्हा त्याची बेस प्राईज १ कोटी होती.
४) मार्टिन गप्टिल (Martin Guptil)
न्यूझीलंडचा दिग्गज टी२० क्रिकेटपटू सलामीवीर मार्टिन गप्टिल याचे नाव देखील लिलावासाठी उपलब्ध असलेल्या अंतिम ५९० खेळाडूंमध्ये आहे. या लिलावात त्याची बेस प्राईस ५० लाख रुपये ठरवली गेली. मात्र, गप्टील मागील वर्षीच्या लिलावात विकला गेला नव्हता. त्यावेळी त्याची बेस प्राईस २ कोटी रुपये होती. त्यामुळे यावेळी त्याने त्याची किंमत कमी केली आहे.
५) मुरली विजय (Murli Vijay)
अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य राहिलेला मुरली विजय यानेदेखील या लिलावासाठी आपला सहभाग नोंदवला आहे. त्याने या लिलावासाठी आपली मूळ किंमत ५० लाख रुपये निर्धारित केली आहे. मात्र, यापूर्वी त्याची किंमत २ कोटी रुपये होती. परंतु, मागील वर्षी कोणीही त्याला बोलीन लावल्याने यावेळी त्याने आपली किंमत कमी केली. विजय याने एक हंगाम पंजाब संघाचे नेतृत्व देखील केले होते.
महत्वाच्या बातम्या-
सचिनला गोलंदाजी करताना घाबरायचा ऑस्ट्रेलियन ‘स्पीडस्टार’; स्वतः केला खुलासा (mahasports.in)