क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. या खेळात जो संघ चांगले प्रदर्शन करणार तोच संघ विजयी होणार. रविवारी (२४ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. ज्या सामन्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहिली जात होती, त्या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाला पाकिस्तान संघाने पराभूत केलं आहे. परंतु बलाढ्य संघ असताना देखील भारतीय संघाकडून नेमकी चूक झाली तरी कुठे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
१) नाणेफेक
या पराभवाचं सर्वात मुख्य कारण म्हणजे नाणेफेक. कारण दुबईच्या मैदानावर जो संघ दुसऱ्या डावात गोलंदाजी करतो त्या संघातील गोलंदाजांना मैदानावर दव असल्यामुळे चेंडू ग्रिप करताना अडचणीचा सामना करावा लागतो, ज्याचा फायदा फलंदाजांना होत असतो. तसेच २०१८ नंतर भारतीय संघाने ८ टी२० सामने गमावले आहेत, ज्यामध्ये त्यांनी प्रथम फलंदाजी करताना १६० पेक्षा कमी धावा केल्या होत्या. या सामन्यात तर भारतीय संघाला फक्त १५१ धावा करण्यात यश आले होते.
२) सलामीवीर फलंदाज ठरले फ्लॉप
पराभवाचं दुसरं मुख्य कारण म्हणजे भारतीय सलामीवीर फलंदाजांची सुपर फ्लॉप फलंदाजी. या मोठ्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल या अनुभवी फलंदाजाकडून चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा होती. परंतु रोहित शर्मा अवघ्या ० धावांवर माघारी परतला. तर केएल राहुलला अवघ्या ३ धावा करता आल्या, ज्याचा परिणाम मध्यक्रमातील फलंदाजांवर जाणवला.
३) शाहीन आफ्रिदिची गोलंदाजी
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठे धक्के दिले.त्याने आपल्या ४ ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघ्या ३१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले, ज्यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीचा समावेश आहे.
४) पाकिस्तान संघाचे सलामीवीर फलंदाज
भारतीय संघाची गोलंदाजी या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरली. १५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांवर दबाव बनवायला सुरुवात केली होती. दोघांनीही डावाखेर अर्धशतकी खेळी करत पाकिस्तान संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
५) भारतीय तिकडी ठरली फ्लॉप
भारतीय संघात मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या ३ अनुभवी गोलंदाजांची तिकडी होती. परंतु हे तिघे ही गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले.मोहम्मद शमी या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याने अपेक्षा भंग करत ३.५ षटकात ४३ धावा खर्च केल्या, ज्यामध्ये त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक: दोन दिवसांत लागले धक्कादायक निकाल; अशी आहे गुणतालिकेची स्थिती