भारतीय संघाची आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत निराशाजनक सुरुवात झाली आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पाकिस्तान संघातील गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारतावर १० गडी राखून विजय मिळवला. तर भारतीय फलंदाजांसह गोलंदाजांनी देखील निराशाजनक कामगिरी केली. विराट कोहली आणि रिषभ पंतला वगळले तर इतर कुठल्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही.
चला तर जाणून घेऊया या सामन्यातील ५ असे खेळाडूविषयी, ज्यांची निराशाजनक कामगिरी ठरली या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचे कारण.
१) केएल राहुल –
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यात जबरदस्त फॉर्ममध्ये होता. परंतु पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने या सामन्यात ८ चेंडूंमध्ये अवघ्या ३ धावा केल्या आणि शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर बाद झाला.
२) रोहित शर्मा –
भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला या सामन्यात खाते देखील खोलता आले नाही. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु तो पहिल्याच चेंडूवर पायचीत होऊन माघारी परतला.
३) मोहम्मद शमी –
या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने ३ गडी बाद केले होते. परंतु पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही. मोहम्मद शमी हा या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्याने ३.५ षटक गोलंदाजी केली आणि सर्वाधिक ४३ धावा खर्च केल्या.
४) भुवनेश्वर कुमार –
भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु तो देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला. गेल्या काही महिन्यांपासून तो फॉर्ममध्ये नाहीये. त्याने ३ षटक गोलंदाजी केली आणि २५ धावा खर्च केल्या.
५) वरूण चक्रवर्ती –
भारतीय संघाचा मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या वरूण चक्रवर्तीने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी केली होती. अशीच कामगिरी तो टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील करेल अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु तो पाकिस्तान संघातील फलंदाजांना अडचणीत टाकण्यात अपयशी ठरला. त्याने ४ षटक गोलंदाजी केली आणि ३३ धावा खर्च केल्या व खाली हात माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या-