आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. ज्याची जोरदार तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. ही स्पर्धा भरपूर वेगळी असणार आहे. कारण, या स्पर्धेत खेळाडूंचा मेगा लिलाव करण्यात येईल. तसेच, यापूर्वी ८ संघ खेळत होते. आता संघांची संख्या वाढून १० झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत तुम्हाला वेगळेपण नक्कीच जाणवेल. या स्पर्धेत आणखी काय काय मोठे बदल होऊ शकतात, चला जाणून घेऊया.
बीसीसीआयने म्हटले की, ‘नवीन संघ २०२२ मध्ये होणाऱ्या स्पर्धेचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत. यापैकी ७ सामने घरच्या मैदानावर तर ७ सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळावे लागणार आहेत.”
कसे असेल आयपीएल २०२२ स्पर्धेचे स्वरूप?
१) ही स्पर्धा देखील २०११ आयपीएल स्पर्धेसारखी खेळवली जाऊ शकते. त्यावेळी देखील १० संघांचा समावेश होता. या १० संघांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती.
२) साखळी फेरीतील सामने सुरू असताना प्रत्येक संघाला ७ सामने घरच्या मैदानावर आणि ७ सामने बाहेर जाऊन खेळावे लागणार आहेत.
३) तसेच साखळी फेरीतील ७० सामने झाल्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल.
४) ज्याप्रकारे आयपीएल २०२१ स्पर्धा पार पडली, त्याच स्वरूपात ही स्पर्धा आयोजित केली तर कठीण होऊ शकते. कारण, आयपीएल २०२२ स्पर्धेत १० संघ असणार आहे. त्यामुळे साखळी फेरीतील सामन्यांची संख्या ९४ होऊ शकते. हे सामने खेळवण्यासाठी जवळ जवळ ७४ दिवस लागू शकतात. त्यामुळे इतर बोर्ड खेळाडूंना इतका वेळ आयपीएल स्पर्धा खेळण्याची अनुमती देणार नाही. त्यामुळे बीसीसीआय दोन्ही संघांची ५-५ च्या गटात विभागणी करू शकते.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “खरं सांगायचं झालं तर आम्हालाही होम आणि अवे स्वरूपात स्पर्धा खेळायची आहे. परंतु, एकाच हंगामात ९४ सामने खेळणे शक्य नाही. कारण, यासाठी ७० दिवसांचा कालावधी लागू शकतो.ज्यामुळे खेळाडू दबावात येऊ शकतात. त्यामुळे नक्कीच या स्पर्धेच्या स्वरूपात बदल केला जाणार आहे. आम्ही याबाबत नक्की निर्णय घेऊ.”