काही दिवसांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ पुढील वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. तब्बल २४ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानमध्ये खेळताना दिसेल. या दौऱ्यासाठी आणखी पाच महिन्यांचा कालावधी असला तरी, ऑस्ट्रेलियाच्या एका प्रमुख खेळाडूने आत्ताच आपण या दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हा खेळाडू नाही जाणार दौऱ्यावर
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौऱ्यावर आपला सर्वात मजबूत संघ उतरवू शकते. मात्र, संघाचा प्रमुख अष्टपैलू व फटकेबाज ग्लेन मॅक्सवेल याने वैयक्तिक कारणास्तव त्या वेळी आपण संघासोबत नसेल असे स्पष्ट केले. असल्याच्या पाकिस्तान दौऱ्यावेळी मॅक्सवेल आपल्या भारतीय मैत्रीणीसह विवाह करू शकतो. मॅक्सवेल म्हणाला,
“ऑस्ट्रेलिया इतक्या मोठ्या काळानंतर पाकिस्तानात जात आहे याचा आनंद आहे. मात्र, मी त्या दौऱ्यावर असेल की नाही हे मला माहीत नाही. माझे लग्न कदाचित त्याच काळात असेल. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही.”
एका पत्रकाराने तुमची मैत्रीण लग्न पुढे ढकलू शकते का? असा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला,
“बिलकुल नाही कारण यापूर्वी दोन वेळा आमचे लग्न पुढे ढकलले गेले आहे आणि पुढील वर्षी लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”
ऑस्ट्रेलिया करणार पाकिस्तानचा मोठा दौरा
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरू होईल. ३ ते ७ मार्च या काळात कराची येथे पहिली कसोटी खेळली जाईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च या कालावधीत रावळपिंडी व २१ ते २५ मार्च या काळात लाहोर येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने लाहोर येथे २९ मार्च, ३१ मार्च व २ एप्रिल रोजी होतील. ५ एप्रिल रोजी लाहोर येथेच दौऱ्यावरील अखेरीचा सामना टी२० स्वरूपाचा होईल.