पुणे। क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळविणा-या युवा खेळाडू व महिलांना प्रोत्साहन देण्याकरीता संवाद, पुणे व नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी (एन.वाय.सी.एस.) प्रस्तुत क्रीडा राज्ञी पुरस्कार २०१९ या कार्यक्रमाचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी क्रीडा प्रशिक्षक गुरुबन कौर यांना क्रीडा राज्ञी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एन.वाय.सी.एस. चे चेअरमन व कार्यक्रमाचे निमंत्रक राजेश पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन इटकर उपस्थित होते. क्रीडा राज्ञी जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि उपरणे असे असणार आहे.
राजेश पांडे म्हणाले, आपले राष्ट्र विकसित राष्ट्र म्हणून जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. त्यामध्ये स्त्री शक्तीचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पुणे शहरातील राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात विविध भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. यामाध्यमातून २०२० मध्ये होणा-या आॅलिंपिक स्पर्धांसाठी नवप्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुरस्कार वितरण सोहळ्याला पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, नीलम गो-हे, सुनेत्रा अजित पवार, भाग्यश्री पाटील, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी, रचिता मिश्री, डॉ.संगीता बर्वे, डॉ.विद्या येरवडेकर, दीपा क्षीरसागर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वेदांगी कुलकर्णी (हौशी सायकलिंग), सायली केरीपाळे (कबड्डी), युगा बिरनाळे (जलतरण), अंकिता गुंड (कुस्ती), श्रेया नानकर (क्लायंबिंग), श्रुतिका सरोदे, वैदेही सरोदे (रोल स्केटिंग), ॠचा चोरडिया (जिम्नॅस्टिक), पृथा वर्टीकर (टेबल टेनिस), अवंतिका नराळे (मैदानी), देविका घोरपडे (मुष्टीयुद्ध), शिरीन लिमये (बास्केटबॉल), काजल भोर (खो-खो), आकांक्षा हगवणे (बुद्धीबळ), ॠतुजा सातपुते (सायकलिंग), साक्षी शितोळे (आर्चरी), पूर्वा बर्वे (बॅडमिंटन), ऋचा धोपेश्वर (ज्युदो), पूनम कलापुरे – काटे (पत्रकार) यांना क्रीडा राज्ञी पुरस्कार २०१९ ने गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण समारंभासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाहिरा प्रा.संगीता मावळे यांचा पोवाडा, रुपाली पाटील व सहका-यांचा योगा, अनघा बोरकर यांचे माऊथ आॅरगन वादन, रेश्मा परितेकर यांची लावणी, जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग यांसह अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. कार्यक्रमाची संकल्पना ही सुनिल महाजन यांची असून राजेश पांडे, सचिन इटकर, निकीता मोघे हे निमंत्रक आहेत. कार्यक्रम विनामूल्य खुला असून क्रीडाप्रेमी आणि पुणेकरांनी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.