पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात मंगळवारी(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघाने 19 वर्षांखालील पाकिस्तान संघाचा उपांत्य (Semi Final) सामन्यात 10 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या विश्वचषकात भारताकडून यशस्वी जयस्वालबरोबरच रवी बिश्नोईने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. बिश्नोईने या विश्वचषकात 5 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो भारताचा या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी गोलंदाज इयान बिशप यांनी बिश्नोईचे कौतुक केले आहे. त्यांनी त्याला जादूगार म्हटले आहे.
मंगळवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान बिशप समालोचन करत होते. या सामन्यात बिश्नोईने पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नाझीरला गुगली टाकत बिट केल्यानंतर त्याचे कौतुक करताना बिशप म्हणाले, ‘हा मुलगा जादूगार आहे’.
बिश्नोईने या सामन्यात 46 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने फवाद मुनिर आणि अब्बास आफ्रिदीला बाद केले. या सामन्यात बिश्नोईबरोबरच भारताकडून सुशांत मिश्राने 3 विकेट्स, कार्तिक त्यागीने 2 विकेट्स घेतल्या. तसेच अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालने प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 43.1 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला.
यानंतर भारताकडून 173 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने नाबाद शतकी खेळी केली. तर दिव्यांश सक्सेनाने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जयस्वालने 105 धावा केल्या आणि दिव्यांशने 59 धावांची खेळी केली.