भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा आज 43वा वाढदिवस आहे. तो राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला. गंभीर 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ही जबाबदारी सांभाळेल.
फॉरमॅट कोणताही असो, गौतम गंभीर गरजेच्या वेळी टीम इंडियासाठी नेहमीच पुढे आला आहे. गंभीरनं आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी दोन महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. या दोन्ही खेळी विश्वचषकाच्या फायनलमध्ये आल्या आहेत. किंबहुना, भारतानं 2 विश्वचषक जिंकले, त्याचं मोठं श्रेय गौतम गंभीरच्या कामगिरीला जातं.
2007 टी20 विश्वचषक – टीम इंडियानं 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाला या जेतेपदापर्यंत नेण्यात गंभीरचं योगदान महत्त्वाचं होतं. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तो सलामीला उतरला होता. या सामन्यात त्यानं 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 75 धावा केल्या. भारतीय संघाकडून ही सर्वात मोठी खेळी होती. गंभीरच्या या खेळीमुळे टीम इंडियानं 20 षटकात 157/5 धावा केल्या होत्या. भारतानं हा सामना 5 धावांनी जिंकून विजेतेपदावर नाव कोरलं.
2011 एकदिवसीय विश्वचषक – 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्येही गंभीरनं आपल्या फलंदाजीनं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना गंभीरनं 122 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीनं 97 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. विशेष म्हणजे तो वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर क्रिजवर आला होता. भारतीय संघाच्या विजयात गंभीरच्या या खेळीचं योगदान महत्त्वाचं होतं.
गौतम गंभीरची कारकीर्द – गौतम गंभीर हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा फलंदाज होता. त्यानं आपल्या कारकिर्दीत 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटीच्या 104 डावात 4154 धावा केल्या. याशिवाय गंभीरनं एकदिवसीय सामन्यांच्या 143 डावांमध्ये 5238 धावा आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये 932 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर
भारताला करावी लागेल पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना, वर्ल्ड कप सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या
सचिन-द्रविडचा ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड, जो कोणताही फलंदाज मोडण्याचे स्पप्नही नाही पाहणार