दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे अध्यक्ष ग्रॅम स्मिथ यांनी एक मोठे विधान केले आहे. स्मिथ म्हणाले की, कोरोना या व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर जागतिक क्रिकेटला पुन्हा उभे करण्यासाठी आयसीसीला एका भक्कम नेतृत्वाची गरज आहे. या पदावर सौरव गांगुली योग्य व्यक्ती असून त्यांच्याकडे आधुनिक क्रिकेटचे ज्ञान आहे. आपल्या नेतृत्वाद्वारे सौरव गांगुली जागतिक क्रिकेटला पुन्हा उभा करू शकतील.
या ग्रॅम स्मिथ म्हणाले की, सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर या पदाला न्याय देऊ शकतील. कोरोनामुळे जगातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकल्याने आर्थिक फटका बसला आहे. ही आर्थिक घडी बसवण्यासाठी सौरव गांगुली योग्य ती मदत करेल असाही विश्वास स्मिथ यांनी व्यक्त केला आहे.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर यांनी परत आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांचा कालावधी मे च्या अखेरपर्यंत समाप्त होणार आहे. गेल्या दोन टर्मपासून ते आयसीसीचे अध्यक्षपद भूषवत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऑगस्ट महिन्यांमध्ये तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका व्हावी असा प्रस्ताव बीसीसीआय पुढे ठेवला आहे. बीसीसीआयने देखील या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी पावसाळ्यानंतर क्रिकेट पुन्हा सुरू होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे वादळ घोंगावत आहे. यादरम्यान भारतात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे.