हिरो इंडियन सुपर लिगची उद्घाटनाची लढत कोचीमध्ये शुक्रवारी होत आहे. एटीके विरुद्ध केरळा ब्लास्टर्स अशा बहुचर्चित लढतीने लिगची दणदणीत सलामी झडेल. एटीकेचा बचाव भेदण्यासाठी आपले खेळाडू चेंडूला एकाच स्पर्शाचा म्हणजे टचचा अचूक आणि आक्रमक खेळ करतील अशी आशा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांना आहे.
तांत्रिक प्रशिक्षणासाठी नेदरलँड्सच्या म्युलेस्टीन यांचा लौकीक आहे. याच पद्धतीचा सदैव पुरस्कार करणारे म्युलेस्टीन ब्लास्टर्ससाठी अशाच खेळाचा अवलंब करतील. त्यानुसार चेंडूला गरजेपेक्षा जास्त वेळा स्पर्श अर्थात टच केला जाणार नाही. अचूक पास दिले जातील. आगेकूच करण्यासाठी वाव मिळावा आणि गोल व्हावेत म्हणून वेगवान पद्धतीचा खेळ करण्यावर त्यांचा भर राहील.
ते म्हणाले की, तुमच्या सर्वोत्तम पोझीशनमध्ये कोणते खेळाडू सर्वोत्तम खेळतात हे ठरवा आणि त्यांच्या खेळाच्या क्लिप्स पाहा असे मी आमच्या खेळाडूंना नेहमी सांगत असतो. असे खेळाडू कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने बरोबर करतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे.
असे खेळाडू लक्षवेधी ठरतात याचे कारण ते गरज नसेल तेव्हा चेंडूला स्पर्श न करता पास देत चाली रचतात. याद्वारे ते खेळाची लय साधतात आणि सामन्यात वेग निर्माण करतात. अशी शैली आमच्या संघात भिनेल अशी मला आशा आहे. ती आमच्या खेळातून दिसून यायला हवी. हे अर्थातच सोपे नाही, पण ते साध्य करण्याचे आमचे ध्येय आहे.
यलो आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लास्टर्सला दोन वेळच्या विजेत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आठ सामन्यांत केवळ एकच विजय मिळविता आला आहे. तीन वर्षांपूर्वी ब्लास्टर्सने 2-1 असा विजय नोंदविला होता.
त्या लढतीत एक गोल केलेला खेळाडू म्युलेस्टीन यांच्याकडे असेल आणि तो आहे इयन ह्युम. ब्लास्टर्सला मोसमातील सलामीला एकदाच विजय मिळू शकला नाही आणि हे एटीकेविरुद्धच घडले होते. हा मुद्दा सुद्धा म्युलेस्टीन यांच्या लक्षात असेल.
एटीकेला तीन मोसमांमध्ये पहिल्या अवे लढतीत एकदा सुद्धा पराभव पत्करावा लागलेला नाही. ब्लास्टर्सविरुद्ध 11 गोल आणि दोन अंतिम सामन्यांत सरशी अशी एटीकेची कामगिरी आहे. दोन वेळा निर्णायक लढतींमध्ये निराशाजनक पराभव पत्करावे लागल्यामुळे ब्लास्टर्स घरच्या मैदानावर खेळत असले तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे पारडे जड असेल.
सर अॅलेक्स फर्ग्युसन यांचे माजी सहायक असलेल्या म्युलेस्टीन यांनी मात्र आत्मविश्वासाने सांगितले की, माझे सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. मी कुणाचीही निवड करू शकतो. उद्या भूतकाळातील निकालांना काहीही महत्त्व नसेल.
एटीकेची स्थिती मात्र अशी नाही. त्यांचा मार्की खेळाडू रॉबीन किन उपलब्ध नसेल. मुख्य प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांच्या मनात मात्र त्यामुळे कोणतीही शंका नाही. मँचेस्टर युनायटेडच्या या माजी स्ट्रायकरसमोर पुरेसे पर्याय आहेत. यामध्ये भारताच्या रॉबीन सिंग याचा समावेश आहे. मध्य फळीत युजीन्सन लिंगडोह आणि जयेश राणे यांच्या रुपाने अचूक पास हेरणारे प्रतिभासंपन्न खेळाडू आहेत.
एटीके संघ कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब करणार हे शेरींगहॅम यांनी उघड केले नाही, पण त्यांनी सांगितले की,आम्ही बचावात्मक खेळावर बरीच मेहनत घेतली आहे, पण आम्हाला घोडदौड करायची आहे. आम्ही उद्या जिंकणार आहोत.
केरळमध्ये खेळण्याच्या कसोटीसाठी आपल्या संघाने कशी तयारी केली याविषयी मात्र त्यांनी सांगितले की,प्रत्येक मुलाचे, प्रत्येक खेळाडूचे, प्रत्येक प्रशिक्षकाचे स्वप्न असते की आपल्याला साठ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितात खेळायला मिळावे. हे प्रेक्षक आम्हाला पाठिंबा देणारे नसतील, पण त्यांना शांत ठेवू शकलो तर ती मोठीच कामगिरी ठरेल.
इतर कोणत्याही मुद्यापेक्षा या लढतीमध्ये सर्वाधिक उत्सुकतेची बाब लक्षात घ्यावी लागेल. घरच्या मैदानावर भक्कम खेळ करणारा संघ विरुद्ध प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर बलाढ्य कामगिरी करणारा संघ असा हा मुकाबला रंगेल. ब्लास्टर्सने गेल्या मोसमात घरच्या मैदानावर सलग सहा विजयांचा धडाका लावला होता. दुसरीकडे एटीकेने अवे लढतींमध्ये चार वेळा बाजी मारली.
ब्लास्टर्सला आपला बालेकिल्ला राखताना एकदाच जड गेले आणि ते एटीकेविरुद्धच घडले. ब्लास्टर्सकरीता संस्मरणीय ठरलेल्या गेल्या मोसमात कोचीमध्ये त्यांना हरविलेला एकमेव संघ एटीकेच होता.
शुक्रवारचा दिवस उजाडेल तेव्हा म्युलेस्टीन यांच्यासमोर एक आव्हान असेल. शेवटी हा फुटबॉलचा खेळ आहे आणि रेकॉर्ड पटकन बदलू शकते याची जाणीव खेळाडूंना व्हावी म्हणून त्यांना प्रयत्न करावे लागतील.
तुम्ही सामन्यावर लक्ष केंद्रीत करा, प्रसंगावर नव्हे. प्रसंग हे प्रेक्षकांसाठी असतात, तर सामने खेळाडूंसाठी असतात असे मी आमच्या संघाला नेहमीत सांगत असतो, अशा शब्दांत म्युलेस्टीन यांनी आपली भूमिका मांडली.
मँचेस्टर युनायटेडचा इतिहास असा समान दुवा असलेले दोन प्रशिक्षक बहुचर्चित सलामीला आमनेसामने येतील.