संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये एकाहून एक सरस फलंदाज मैदानावर उतरले आहेत. यात बऱ्याचशा अनुभवी क्रिकेटपटूंसह युवा शिलेदारांचाही समावेश आहे. क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरुपात फलंदाजांच्या बॅटमधून षटकार-चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते आहे.
परंतु टी२० विश्वचषकात एक असा विक्रम आहे, जो जगातील सर्वात विस्फोटक फलंदाजाच्या नावावर आहे आणि कमालीची बाब म्हणजे, त्याच्या जवळपासही इतर कोणता फलंदाज नाही. हा विक्रम आहे, टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणे आणि हा मोठा विक्रम आपल्या नावे करणारा मातब्बर फलंदाज आहे, ख्रिस गेल.
‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून प्रसिद्ध असलेला गेल यंदाच्या टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाचा भाग आहे. परंतु हा त्याचा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. कारण हा दिग्गज फलंदाज सध्या ४२ वर्षांचा झाला आहे. असे असले तरीही, त्याच्या फलंदाजीची धार अजूनही कमी झालेली नाही.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार
आतापर्यंत ख्रिस गेलने टी२० विश्वचषकात २८ सामने खेळताना सर्वाधिक ६० षटकार ठोकले आहेत. कौतुकास्पद बाब म्हणजे, गेलव्यतिरिक्त या स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाला इतके षटकार मारता आलेले नाहीत. या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फलंदाजाने ३३ षटकार ठोकले आहेत. तसेच गेलनंतर ५ स्थानांवर ज्या फलंदाजांची नावे आहेत, ते सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत. त्यामुळे गेलचा हा विक्रम अजून पुढील काही वर्षे अबाधित राहू शकतो.
गेलनंतर टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग ३३ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) ३१ षटकारांसह तिसऱ्या, एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका) ३० षटकारांसह चौथ्या आणि माहेला जयवर्धने (श्रीलंका) २५ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.
सक्रिय फलंदाजांमध्ये गेलनंतर रोहित दुसऱ्या स्थानी
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या फलंदाजांविषयी बोलायचे झाल्यास, गेलनंतर टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याच्याबाबतीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २८ सामने खेळताना २४ षटकार मारले आहेत. त्याच्याबरोबर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. परंतु त्यांच्या षटकारांची संख्या गेलपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे गेलचा हा विक्रम मोडणे त्यांच्यासाठी जवळपास अशक्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या-