एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. विराट २० जून रोजीच आपल्या कसोटी कारकिर्दीला १० वर्ष पूर्ण करत असल्याने हा दिवस काहीतरी खास असावा अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, घडले भलतेच! सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला संकटातून बाहेर काढणाऱ्या कर्णधार कोहलीला दुसऱ्या दिवसातील चौथ्याच षटकात युवा काईल जेमिसनने पायचीत केले आणि त्याची खेळी पहिल्या दिवशीच्या ४४ धावांवर संपुष्टात आली. परंतु, विराटला बाद करण्याची तयारी जेमिसनने तीन महिन्यापूर्वीच केली होती. त्या रणनीतीला प्रत्यक्षात उतरवत जेमिसनने विराटला बाद करून भारताला संकटात टाकले.
कोण आहे जेमिसन
अगदी दीड वर्षापूर्वीच कायले जेमिसन या ६ फूट ८ इंच एवढ्या उंचपुऱ्या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अल्पावधीतच त्याने न्यूझीलंडच्या संघात आपली जागा बनवली. अप्रतिम गोलंदाजी आणि थोडीफार फटकेबाजी असे अष्टपैलूत्व त्याच्याकडे असल्याने आयपीएल संघांची नजर त्याच्यावर पडली नाही तर नवलच! आयपीएल लिलावात तब्बल १५ कोटी रुपयांची बोली मिळवत तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघात समाविष्ट झाला.
चक्क विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार
जेमिसन आरसीबीमध्ये आल्यानंतर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या तयारीसाठी आपल्याला त्याचा फायदा होईल, असा विचार विराट कोहलीने आयपीएल दरम्यान केला असेल. त्यामुळेच, विराटने एकदा सहज सरावादरम्यान जेमिसनला म्हटले, “जेमी, तू ड्यूक बॉलने भरपूर गोलंदाजी केली असेल. तू मला नेट्समध्ये लाल ड्यूक बॉलने गोलंदाजी केली तर मला खूप आनंद होईल.”
कोणत्याही गोलंदाजांसाठी विराटला गोलंदाजी करणे म्हणजे स्वप्न असते. ते या गोष्टीची वाट पाहत असतात. मात्र, जेमिसनने या गोष्टीसाठी चक्क विराटला नकार दिला.
“जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातच मी तुला ड्यूक बॉलने गोलंदाजी करेल,” असे उत्तर जेमिसनने विराटला दिले होते. हा सर्व खुलासा आरसीबीचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल ख्रिस्टियन याने आयपीएलदरम्यान केला होता.
तो निर्णय ठरला सार्थ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी अर्धशतकी सुरुवात दिली. मात्र, ८८ धावांवर ३ गडी बाद झाल्यानंतर विराटने उपकर्णधार अजिंक्य रहाणेसोबत दुसऱ्या दिवशी संघाचा डाव १४६ पर्यंत नेला.
तिसऱ्या दिवशी सर्वांना विराटकडून अधिक धावांची अपेक्षा असताना विराट दुसऱ्या दिवसाच्या ४४ धावांमध्ये भर न घालता चौथ्या षटकातच जेमिसनच्या इनस्विंग गोलंदाजीवर पायचीत झाला.
त्याने या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली मात्र, निर्णय बदलला नाही. विराटला ड्यूक बॉलने आपल्या गोलंदाजीचा सराव न व्हावा ही जेमिसनची योजना पहिल्या डावात तरी यशस्वी ठरली.
जेमिसनने गाजवली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
भारतीय संघाविरुद्धच २०२० च्या सुरुवातीला कसोटी पदार्पण करणाऱ्या ६ फूट ८ इंच उंचीच्या २६ वर्षीय जेमिसनने न्यूझीलंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेदरम्यान त्याने खेळलेल्या ६ कसोटी सामन्यात ३६ बळी आपल्या नावे केले. विशेष म्हणजे या सर्व सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळाला.
आता या ऐतिहासिक अंतिम सामन्यातही आत्तापर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत या भारताच्या सर्वात महत्वपूर्ण फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी त्याने केली असून, न्यूझीलंडला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करतोय.
महत्त्वाच्या बातम्या –