भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयाने चाहत्यांना आश्चर्य वाटलं. त्याने अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. हार्दिक गोलंदाजीसाठी तंदुरुस्त नसतानाही विराटने त्याला गोलंदाजी का दिली? हा प्रश्न सर्वांनाच पडला. आता विराटने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी केली उत्कृष्ट कामगिरी
दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डेविड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 142 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या स्मिथनेही शतक ठोकले. एवढेच नव्हे, तर स्मिथव्यतिरिक्त इतर चार फलंदाजांनीही अर्धशतक ठोकले.
इतर गोलंदाज अपयशी ठरल्यावर हार्दिकने केली गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेळेत बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. एवढेच नव्हे, तर धावा रोखण्यातही त्यांना यश आले नाही. अशा परिस्थितीत गोलंदाजीसाठी तंदुरुस्त नसतानाही भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या गोलंदाजी करायला आला.
हार्दिकला विचारून घेतला निर्णय- विराट
सामन्यानंतर विराटने सांगितले की, “हार्दिकला गोलंदाजी देण्याचा निर्णय त्याला विचारून घेतला होता. मी हार्दिकला विचारले की, तुला कसे वाटत आहे?. मला ठीक वाटत आहे, असे तो म्हणाला. तो गोलंदाजी करण्यास तयार होता. षटक फेकल्यावर त्याला थोडे बरे वाटले. त्यानंतर तो म्हणाला की, मी पुन्हा दोन षटके फेकू शकतो.”
…योजनेचा केला खुलासा
त्यानंतर कोहली हसत म्हणाला की, “हार्दिकला गोलंदाजी देऊन आम्ही आमच्या योजनेचा खुलासा केला.”
हार्दिकने विराटचा निर्णय सार्थकी ठरवत शतकवीर स्टीव्ह स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टीव्ह स्मिथ भारतीय संघासाठी ‘भीतीदायक’, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची प्रतिक्रिया
बीसीसीआयने घडवून आणला विराट, रोहित आणि शास्त्रींमध्ये कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद?
‘या’ तारखेपासून भारतात सुरु होणार देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा? बीसीसीआयने लिहिलेल्या पत्रात उल्लेख