भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Match Test Series) सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला गेला असून भारताने १ डाव २२२ धावांनी हा सामना जिंकला आहे. यानंतर उभय संघ दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी बंगळुरू येथे भिडणार आहेत. हा सामना १२-१६ मार्चदरम्यान दिवस-रात्र (Day-Night Test) स्वरूपात खेळवला जाणार आहे.
या सामन्यापूर्वी पाहुण्या श्रीलंकेच्या संघासाठी वाईट बातमी आली आहे. मोहाली कसोटीत अर्धशतक ठोकणारा त्यांचा वरच्या फळीतील फलंदाज पथुम निसांका (Pathum Nissanka) बंगळुरू कसोटीतून (Bangalore Test) बाहेर झाला आहे. त्याच्याबरोबरच वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) हादेखील या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंकेच्या वरच्या फळीतील फलंदाज निसांका याचे पाठीचे जुने दुखणे पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे तो बंगळुरू कसोटीतून बाहेर होऊ शकतो. निसांकाने मोहाली कसोटीत भारताच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना पहिल्या डावात नाबाद ६१ धावांची खेळी केली होती.
श्रीलंका क्रिकेटच्या एका अधिकाऱ्याने क्रिकवायरशी बोलताना सांगितले आहे की, “निसांकाला जुन्या दुखापतीमुळे पाठीमध्ये वेदना होत आहेत. आम्ही त्याच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहोत. परंतु त्याचे इतक्या लवकर या त्रासातून बाहेर येणे जरा कठिण दिसत आहे.” जर निसांका बंगळुरूतील दिवस-रात्र कसोटीतून बाहेर झाला, तर त्याच्याजागी दिनेश चंडिमल किंवा कुसल मेंडिस यांना संघात जागा दिली शकते. हे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे श्रीलंकेचा संघ त्याचा फायदा घेऊ इच्छेल.
दुष्मंता चमीराही असेल अनुपलब्ध
श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज चमीराला विश्रांती दिली आहे. त्यांच्या या निर्णयामागचे कारण त्याच्यावरील वर्कलोड कमी करणे हे आहे. आगामी टी२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये होणारा वनडे विश्वचषक लक्षात घेता संघाने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, चमीराच्या जाण्याने श्रीलंकेच्या संघाला जास्त नुकसान होणार नाही. कारण त्याला पहिल्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेच्या संघात जागा दिली गेली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात पोहोचला ‘सर जडेजा’! आफ्रिदीने भारतीय फिरकीपटूच्या गोलंदाजीची केली नक्कल, झाला ट्रोल
मलिंगा इज बॅक! यावर्षी मुंबई नव्हेतर ‘या’ संघाला देणार गोलंदाजीचे धडे
विश्वचषकात पाकिस्तान महिला संघाकडून मोठी चूक; एकाच षटकात टाकले ‘इतके’ चेंडू