भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 series) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशालामध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. दरम्यान, भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याला क्षेत्ररक्षक करताना प्रायवेट पार्टवर चेंडू लागल्याचे पाहायला मिळाले.
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यााचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान एक चेंडू वेंकटेशच्या प्रायवेट पार्टवर जाऊन लागला आणि त्याला गंभीर दुखापत होता-होता राहिली. श्रीलंका संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश चंडीमलचा झेल घेताना वेंकटेशला हा चेंडू लागला. परंतु, तरीही तो हासताना दिसत होता. चेंडू लागण्यापेक्षा झेल घेतल्याचा त्याला अधिक आनंद वाटत असल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना श्रीलंका संघ फलंदाजी करत असताना १३ व्या षटकात घडली. भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील पहिला चेंडू त्याने ऑफ स्टंपवर टाकला आणि आणि चंडीमलने तो चेंडू बॅकफूटवर जाऊन जोरात मारला. त्याने मारलेला शॉट थेट पॉइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या वेंकटेश अय्यरच्या हातात गेला. अय्यरने झेल पकडला, पण चेंडू त्याच्या प्रायवेट पार्टपर्यंत पोहोचला होता, ज्यामुळे नक्कीच त्याला वेदना झाल्या.
झेल घेतल्यानंतर वेंकटेश आनंद साजरी करताना दिसला, पण वेदनेमुळे लगेचच तो जमीनीवर खाली बसला. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरचे हसू मात्र किंचितही कमी झाले नाही. थोड्याच वेळात सर्वकाही ठीक झाले आणि तो पुन्हा क्षेत्ररक्षण करू लागला. जर त्याची दुखापत गंभीर असती, तर त्याला मैदान सोडावे लागले असते.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने ५ विकेट्सच्या नुकसनावार १४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांनी सोपा विजय मिळवला. भारताने चार विकेट्सच्या नुकसानावर आणि अवघ्या १६.५ षटकात लक्ष्य गाठले. वेंकटेश पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने ४ चेंडूत ५ धावा केल्या आणि स्वस्तात विकेट गमावली.
महत्वाच्या बातम्या –
भारताने आठव्यांदा दिला प्रतिस्पर्धांना टी२० मालिकेत व्हाईटवॉश, ‘या’ कर्णधारांनी केलाय कारनामा