क्रिकेटच्या खेळात नेहमीच विजय आणि पराजय असणार आहे. स्पर्धा कोणतीही असो, प्रत्येक संघ विजयाच्या शोधात असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटच्या तीनही स्वरूपाच्या विश्वस्पर्धा आयोजित करते. मर्यादित षटकांमध्ये याला विश्वचषक म्हणतात. तर कसोटी प्रकारात अजिंक्यपद स्पर्धा खेळवली जाते, ज्याचा पहिला विजेता नुकताच न्यूझीलंड संघ ठरला आहे. या स्पर्धेचा दुसरा हंगाम इंग्लंड-भारत कसोटी मालिकेसह सुरू झाला आहे.
सर्व संघ आयसीसी स्पर्धा जिंकण्याची इच्छा बाळगतात. मात्र, विजेतेपद फक्त एका संघाच्या हातात येऊ शकते. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकूण १२ क्रिकेट विश्वचषक, ८ चॅम्पियन्स ट्रॉफी, ६ टी -२० विश्वचषक आणि एक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आत्तापर्यंत खेळले गेले आहे. या लेखातून आपण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांबद्दल जाणून घेऊ.
५. पाकिस्तान (७९ विजय)
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली १९९२ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाने प्रत्येक विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. या संघाने २००९ मध्ये टी -२० विश्वचषकही जिंकला आहे. जर सर्व आयसीसी स्पर्धांचे आकलन केले तर या संघाने आतापर्यंत एकूण १४८ सामने खेळले आहेत. त्यापैकी ७९ सामने जिंकले आहेत आणि ६३ पराभव त्यांच्या खात्यात नोंदवले गेले आहेत.
४. इंग्लंड (८८ विजय)
साल २०१९ च्या क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडला हरवून पहिल्यांदा वनडे विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडच्या संघानेही प्रत्येक वेळी विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेटचा जनक म्हणून ओळखला जाणारा हा संघ या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये एकूण १६१ सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या खात्यात ८८ विजय आणि ६६ सामने आहेत.
३. न्यूझीलंड (८९ विजय)
जून २०२१ मध्ये भारतीय संघाला पराभूत करुन जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाने २००० मध्ये एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली या संघाने अनेक वर्षे चॅम्पियनप्रमाणे कामगिरी केली आहे. तसेच, या संघाने सर्व आयसीसी ट्रॉफीमध्ये १५५ सामने खेळले आहेत. या सर्व ८९ विजय आणि ६० सामन्यांची नोंद या संघाच्या खात्यात झाली आहे.
२. भारत (१०३ विजय)
क्रिकेट विश्वचषक १९८३ आणि २०११ मध्ये जिंकून जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा भारतीय क्रिकेट संघ गेल्या दोन दशकांपासून क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व टिकवून आहे. भारताने २००२ साली श्रीलंकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयुक्त विजेतेपद स्विकारले आहे. तसेच त्यानंतर २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच २००७ सालच्या पहिल्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपदही भारताने मिळवले आहे. भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत १६४ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी १०३ सामने जिंकले आहेत तर, फक्त ५३ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
१. ऑस्ट्रेलिया (१०५ विजय)
गेल्या अनेक दशकांपासून क्रिकेट विश्वावर राज्य करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वात यशस्वी संघ आहे. ५ वेळा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच आपले वर्चस्व ठेवले आहेत. वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सात वेळा खेळलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये एकूण १६१ सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी १०५ सामने जिंकले आहेत आणि ४८ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लीड्स कसोटीत अश्विन खेळणार का? विराटने दिले ‘असे’ उत्तर
है तैयार हम! लीड्स कसोटीपूर्वी भारतीय फलंदाजांची तयारी पूर्ण, पाहा व्हिडिओ