पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन व्हावं अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. आता या दिशेनं सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीला एक ‘लेटर ऑफ इंटेंट’ पाठवलं आहे. हे पत्र 1 ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आलं. या पत्राद्वारे भारतानं 2036 मध्ये होणारी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत हा त्या 10 देशांपैकी एक आहे, ज्यांनी 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. भारतानं आतापर्यंत एकदाही या स्पर्धेचं आयोजन केलेलं नाही. देशानं याआधी राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा आयोजित केली आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीनं भारतासह अन्य देशांशी चर्चा सुरु केली होती. यामध्ये मॅक्सिको, इंडोनेशिया, तुर्की, भारत, पोलंड, इजिप्त आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या आपल्या भाषणात 2036 ऑलिम्पिक स्पर्धेचा उल्लेख केला होता. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना यासंबंधी इनपूट देण्याचं आवाहन केलं होतं.
भारतात जर ऑलिम्पिक स्पर्धेच आयोजन होणार असेल, तर यासाठी गुजरातमधील अहमदाबाद शहराचं नाव आघाडीवर आहे. मात्र या शहरात अद्याप एकदाही मोठ्या स्पर्धेचं आयोजन झालेलं नाही. भारतानं शेवटची मोठी स्पर्धा 2010 मध्ये आयोजित केली होती. तेव्हा नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यापूर्वी नवी दिल्ली येथेच 1951 आणि 1982 साली आशियाई स्पर्धेचं आयोजन झालं होतं. त्यामुळे आता 2036 ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद कोणत्या शहराला मिळतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा –
SA VS IND; 6 षटकार आणि विश्वविक्रम, पहिल्याच टी20 मध्ये कर्णधार सूर्याकडे इतिहास रचण्याची संधी!
700 टेस्ट विकेट्स घेणारा दिग्गज पहिल्यांदाच आयपीएलच्या रिंगणात, मुळ किंमत जाणून व्हाल थक्क!
आयपीएल मेगा लिलावात 409 परदेशी खेळाडू सहभागी, या 2 देशांतील सर्वाधिक!