प्रो कबड्डी लीगतर्फे ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमातून आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे सामने होत नसल्याने चाहत्यांशी जोडले रहावे म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमाचे दुसरे सत्र कालपासून(४ ऑक्टोबर) सुरु झाले आहे. ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच भागात भारताचा माजी कर्णधार अजय ठाकूर उपस्थित होता.
प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात त्याने अनेक विषयांवर गप्पा मारल्या. यादरम्यान त्याने राहुल चौधरीबरोबर असलेल्या त्याच्या मैत्रीबद्दलही सांगितले. अजयने काही वर्षांपूर्वी पनवेलला झालेल्या एका स्पर्धेत स्वत:चा सर्वोत्तम चढाईपटूचा पुरस्कार राहुलला दिला होता.
याबद्दल सांगताना अजयने सांगितले की ‘त्यावेळी राहुल नवीन होता. मी एअर इंडियाकडून खेळत होतो आणि संघातील प्रमुख चढाईपटू होतो. पण मी राहुलला चढाईसाठी अनेकदा पाठवले. पण प्रेक्षक सर्वोत्तम चढाईपटू म्हणून माझ्या नावाचा गजर करत होते. त्यावेळी राहुल नाराज झाला. तेव्हा २५ हजार रुपये बक्षीस रक्कम होती. मला तेव्हा वाटले की राहुलला हा पुरस्कार मिळायला हवा, त्यामुळे मी त्याला स्टेजवर बोलवले. त्याने चांगला खेळ केला होता आणि तो यासाठी पात्र होता, असे मला वाटते.’
पुढे अजयने सांगितले की ‘राहुल तेव्हा म्हणाला होता, हे बक्षीस आपण दोघांमध्ये विभागून घेऊ. पण मी मात्र बक्षिसाची पूर्ण रक्कम त्यालाच ठेवण्यास सांगितले. ह्या कृतीने मला राहुल सारख्या नव्या दमाच्या खेळाडूला प्रोत्साहन द्यायचे होते. ही एक छोटी गोष्ट होती, पण ती आयुष्यभर आम्हा दोघांच्या आणि प्रेक्षकांच्या स्मरणात राहील.’
अजयने स्वत:चा पुरस्कार राहुलला देऊन तो केवळ एक चांगला कबड्डीपटूच नाही तर एक चांगला व्यक्ती असल्याचेही दाखवून दिले होते.
या व्यतिरिक्त अजयने फ्रॉग जम्प ही त्याची आवडती चाल असल्याचेही सांगितले. तसेच त्याने २०१६ ला विश्वचषक जिंकणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचेही सांगितले आहे.
अजयने आत्तापर्यंत प्रो कबड्डीमध्ये ११५ सामने खेळले असून ८११ गुण मिळवले आहेत. तसेच त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याचा २०१४ च्या एशियन गेम्स विजेत्या भारतीय संघात आणि २०१६ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात समावेश होता. त्याला अर्जून पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला कबड्डीपटू आहे.