मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत भारताने इंग्लंड विरुद्ध १-१ अशी बरोबरी साधताना सामन्यात वर्चस्व राखण्याची संधी गमावली आहे. अखेरच्या काही क्षणात इंग्लंडने गोल करून सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवले.
भारताने सामन्याच्या पहिल्या सत्रातच आघाडी मिळवली होती. ही आघाडी शिलानंद लाक्राने पहिल्या सत्रात १४ व्या मिनिटाला गोल करून मिळवून दिली. पहिल्या सत्रात मिळालेली आघाडी भारताच्या डिफेंडर्सने उत्तम खेळ करत तिसऱ्या सत्रापर्यंत टिकवून ठेवली होती.
मात्र चौथ्या सत्रात सामना संपण्यासाठी अवघे ८ मिनिट शिल्लक असताना इंग्लंडला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीच्या निर्णया विरोधात भारतीय संघाने अपील केले होते. मात्र रिव्युव्हमध्ये नीलकांत शर्माकडून स्टिक चेक झाले असल्याचे दिसून आले. या पेनल्टीवर इंग्लंडकडून मार्क ग्लेघोर्ने भारताचा गोलकिपर क्रिष्णन पठाणच्या उजवीकडे चेंडू मारत गोल केला.
मार्कने केलेल्या या गोलमुळे सामना १-१ असा बरोबरीचा झाला. हा सामना भारताला सहज जिंकता आला असता मात्र भारताला मिळालेल्या संधींचा उपयोग करता न आल्याने बरोबरीत समाधान मानावे लागले.
या सामन्यात भारताला ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. पण त्यातील एकाही पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारताच्या खेळाडूंना यश आले नाही.
FT. India held on to their early lead with a resolute defensive performance till a late PS gave England the opportunity to score past Suraj Karkera in the dying minutes.#IndiaKaGame #INDvENG #SultanAzlanShahCup pic.twitter.com/vfhIau76oj
— Hockey India (@TheHockeyIndia) March 4, 2018
याआधी भारताने या स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्ध पहिल्या सामन्यात ३-२ असा पराभव स्वीकारला आहे. आता भारताचा पुढील सामना मंगळवारी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.