टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी शुक्रवारी भारताकडून टेस्ट क्रिकेटमधून पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये हे दोघे मैदानात उतरले. यासह चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने तब्बल 20 क्रिकेटपटूंना संधी दिली. हा 143 वर्षांच्या क्रिकेट इतिहासातला विक्रम आहे.
20 खेळाडूंना एका सीरिजमध्ये वापरणे ही भारतीय टीमची रणनीती नसून अपरिहार्यता होती. कारण भारताचे एकामागून एक खेळाडू दुखापतीने त्रस्त होते. मालिकेआधीच रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने तो केवळ दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध होता. तर भर मालिकेत मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह एवढ्या खेळाडूंना दुखापत झाली. याशिवाय विराट कोहलीने पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्याही जागी नवीन खेळाडू संघात आला.
143 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमने एवढ्या खेळाडूंना मैदानात उतरवले. याआधी हे रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर होता. 2013-14 साली ऍशेस सीरिजमध्ये इंग्लंडने 18 खेळाडू मैदानात उतरवले होते.
भारताने पहिली टेस्ट मॅच 1932 साली खेळली होती. नटराजन भारतासाठी टेस्ट खेळणारा 300 वा आणि वॉशिंग्टन सुंदर 301 वा खेळाडू आहे. जगातली पहिली टेस्ट 1877 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 2404 टेस्ट मॅच झाल्या आहेत.
भारताने संपूर्ण मालिकेत खेळवलेले खेळाडू:
विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, शुबमन गिल,हनुमा विहारी,आर अश्विन,रविंद्र जडेजा,वृद्धिमान साहा,रिषभ पंत, जसप्रीत बुमराह,मोहम्मद शमी, उमेश यादव,नवदीप सैनी. मोहम्मज सिराज,रोहित शर्मा,वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर.
महत्वाच्या बातम्या:
ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या या दोन चुका
रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर अशा आल्या प्रतिक्रिया