दुबई। रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धांमध्ये टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील १६ वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने १० विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा कोणत्याही क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. त्यामुळे क्रिकेटविश्वातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने एक अनोखी कल्पना सुचवली आहे.
रविवारी भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर पीटरसनने केलेल्या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की ‘आयडिया: भारताने पाकिस्तानसोबत दरवर्षी ३ टी२० सामने त्रयस्थ ठिकाणी ५ दिवसांत खेळावे. १५ खेळाडूंचा संघ असावा आणि १५ मिलीयन डॉलर जिंकणाऱ्या संघाला पारितोषिक द्यावे. शहर, देश, ब्रॉडकास्टर या पाच दिवसांसाठी प्रत्येक वर्षी रांगेत उभे राहतील.’
भारत आणि पाकिस्तान संघात झालेला सामना १०० कोटी पेक्षाही अधिक लोकांनी पाहिला होता. त्यामुळे हा आकडा समोर आल्यानंतर पीटरसनचे हे ट्वीटही समोर आले.
https://twitter.com/KP24/status/1452469805949218821
साल २०१२-१३ पासून झाली नाही भारत-पाकिस्तान मालिका
गेल्या ८ वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये कोणत्याच प्रकारात द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. या दोन संघात अखेरची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ साली खेळवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तान संघ २ टी२० आणि ३ वनडे सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. यानंतर या दोन संघात कोणतीही मालिका खेळवण्यात आली नाही.
गेल्या ८ वर्षांत हे दोन संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. रविवारच्या सामन्यापूर्वी या दोन संघात अखेरचा सामना २०१९ सालच्या वनडे विश्वचषकात झाला होता. त्यावेळी भारताने बाजी मारली होती.
पाकिस्तानचा एकतर्फी विजय
रविवारी पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम गोलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावांवर रोखलं. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तसेच, रिषभ पंतने ३९ धावांचे योगदान दिले. अन्य कोणालाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाकडून १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी केल्या. या दोघांनी मिळून विकेट न गमावता १७.५ षटकात पाकिस्तानला १५२ धावसंख्या गाठून दिली आणि संघाला विजय मिळवून दिला. बाबर आझमने नाबाद ६८ धावांची आणि रिझवानने नाबाद ७९ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
कडक ना भावा! हवेत झेपावत अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शहजादने घेतला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
शमीवर अनावश्यक टीका, राहुल गांधींनाही राहवेना; ट्विट करून साधला निशाणा