भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिला संघ देखील जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. महिला संघाच्या या दौऱ्याला एकमेव कसोटी सामन्यापासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध एकूण १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे. त्यापूर्वी सध्या भारतीय संघांच्या कसोटी जर्सीचे फोटो सर्वांसमोर येत आहेत. भारतीय महिला कसोटी संघाची जर्सी देखील सर्वांसमोर आली असून हरमनप्रीत कौरने हे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
अशी आहे कसोटी संघाची जर्सी
हरमनप्रीतने शेअर केलेल्या फोटोनुसार भारतीय महिला संघाची जर्सी पांढऱ्या रंगाची असून त्यावर पुढच्या बाजूला संघाचे मुख्य प्रायोजक बायजू कंपनीचे नाव आहे. तसेच जर्सीच्या हातावरही बायजूचे नाव आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे किट प्रायोजक एमपीएल कंपनीचे नावही जर्सीच्या पुढील बाजूस आहे. त्याचबरोबक बीसीसीआयचा लोगोही आहे. जर्सीच्या मागील बाजूस खेळाडूचे नाव आणि जर्सी क्रमांक आहे.
सात वर्षांनंतर भारतीय महिला संघ खेळणार कसोटी सामना
या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात भारतीय महिला संघ एकमेव कसोटी सामन्याने करणार आहे. ब्रिस्टोल येथे १६ ते १९ जून दरम्यान हा कसोटी सामना होईल. यापूर्वी भारतीय महिला संघाने नोव्हेंबर २०१४ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळताना दिसेल.
त्यानंतर तीन वनडे सामने २७ जून, ३० जून आणि ३ जुलै रोजी खेळवले जातील. यानंतर टी२० मालिका ९ जुलैपासून सुरू होईल आणि ही मालिका १४ जुलैपर्यंत चालणार आहे.
भारतीय महिला संघ करतोय कसून तयारी
या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईत क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. पण यादरम्यान त्यांना जिममध्ये व्यायाम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे सध्या आपल्या तंदुरुस्तीवर भारतीय महिला संघ मेहनत घेताना दिसत आहे. त्यांचा जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.
इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.
भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक –
एकमेव कसोटी सामना – १६ ते १९ जून, ब्रिस्टोल
पहिला वनडे सामना – २७ जून, ब्रिस्टोल
दुसरा वनडे सामना – ३० जून, टॉन्टन
तिसरा वनडे सामना – ३ जुलै, वॉरेस्टर
पहिला टी२० सामना- ९ जुलै, नॉर्थॅम्प्टन
दुसरा टी२० सामना – ११ जुलै, होव
तिसरा टी२० सामना – १४ जुलै, चेम्सफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
‘ऑस्ट्रेलियाला चकित होण्याची गरज नाही, त्यांना भारताचे स्टँडबाय खेळाडूसुद्धा पराभूत करतील’
धोनी की विराट? कोण आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, पाहा आकडेवारी
WTC Final: पुजाराने पुढे आणली भारतीय संघाची नवीकोरी जर्सी, जडेजापेक्षा आहे वेगळी