डर्बन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज शतकी खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २७० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा(२०) आणि शिखर धवन(३५) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. परंतु त्यानंतर कर्णधार विराट आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी मिळून भारताचा डाव सांभाळताना तिसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी रचून भारताचा विजय सुकर केला.
विराटने ११९ चेंडूत ११२ धावा केल्या. हे त्याचे वनडेतील ३३ वे शतक आहे. विराटने या त्याच्या शतकी खेळीत १० चौकार मारले. त्याच्याबरोबरच त्याची भक्कम साथ दिलेल्या रहाणेने ८६ चेंडूत ७९ धावा केल्या. भारत विजयाच्या समीप असताना या दोघांच्याही विकेट गेल्या. त्यामुळे अखेर एम एस धोनीने(४*) चौकार ठोकत ४५.३ षटकात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दक्षिण आफ्रिकेकडून अँडील फेहलूकवयो(२/४२) आणि मोर्ने मॉर्केल(१/३५) यांनी बळी घेतले.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेकडून त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने शतक झळकावले. त्याने ११२ चेंडूत १२० धावा केल्या. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
त्याच्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटॉन डिकॉक(३४), हाशिम अमला(१६), ख्रिस मॉरिस(३७), जेपी ड्युमिनी(१२) आणि अँडील फेहलूकवयो(२७*) यांनी धावा केल्या. बाकी फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता अली नाही.
भारताकडून कुलदीप यादव(३/३४), युजवेंद्र चहल(२/४५),भुवनेश्वर कुमार (१/७१) आणि जसप्रीत बुमराह (१/५६) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेला ५० षटकात ८ बाद २६९ धावांवर रोखले.